झायडसची डीसीजीआयकडे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी देण्याची मागणी


नवी दिल्ली : झायडसने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) कोरोना विरोधातील लढाईमध्ये एक महत्वाचे हत्यार म्हणून पुढे येत असलेल्या मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या चाचणीला (ZRC-3308) परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे. अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीचा वापर केला जात आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या डोसनंतर कोरोनाबाधिताला रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते. तसेच या डोसमुळे कोरोना होण्याचीही शक्यता अत्यंत कमी आहे.

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी म्हणजेच ज्याला कॉकटेल ड्रग्ज म्हटले जाते, त्याचा वापर आता भारतात काही ठिकाणी सुरु करण्यात येत आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी घेतल्यास लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अत्यंत कमी असतो, हे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी हे कोरोना विरोधातील प्रमुख हत्यार असल्याचे मत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतात मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीची सिप्ला आणि स्वित्झरलॅन्डची कंपनी रॉश या दोन कंपन्या एकत्र येऊन निर्मिती करत आहेत.

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी हे एक कॉकटेल ड्रग्ज आहे की जे घेतल्यानंतर कोरोना रुग्णाची प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये Casirivimab आणि Imdevimab या दोन औषधांचा समावेश आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीमुळे कोरोना मानवी शरीरात पसरत नाही, कारण त्याला आवश्यक ते खाद्य मिळत नाही.

कोरोनाचे निदान एखाद्या रुग्णामध्ये झाल्यानंतर त्याला हे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी तीन दिवसांच्या आत द्यावे लागते. हे एक प्रकारचे इम्युनिटी बुस्टर आहे. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. तसेच त्याला रुग्णालयात भरती होण्याचीही गरज राहत नाही. भारतात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असताना याच्या वापराला परवानगी मिळाली, तर हे मोठे यश असणार आहे.