लसीकरणाच्या सर्टिफिकेटचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे पडू शकते महागात


मुंबई – कोरोनाच्या संकटकाळात कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस संजीवनीपेक्षा कमी नाही. ही लस प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. लसीकरणानंतर प्रत्येकाला त्याचे प्रमाणपत्र दिले जाते जेणेकरुन डोस घेतल्याची माहिती आपल्याकडे रहाते. हे प्रमाणपत्र अनेकजण सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळत आहे. पण यापुढे असे करणे आपल्याला महागात पडू शकते. बऱ्याच लोकांना सोशल मीडिया जसे की ट्विटर, फेसबुक किंवा इतर साइट्सवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करण्याची सवय आहे. पण, सायबर गुन्हेगार याचा फायदा घेत आहेत.

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र सायबर सेलचे एसपी संजय शिंत्रे म्हणाले की, अशा प्रकारे आपला तपशील शेअर करणे धोकादायक आहे. लस घेतल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या प्रमाणपत्रावर तुमची वैयक्तिक माहिती असते. ही माहिती सायबर गुन्हेगार डार्क नेटवर विकू शकतात किंवा दुसऱ्या एखाद्याला एडिट करुन विकू शकता.

आपण हे प्रमाणपत्र वापरुन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकता किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकता. बऱ्याच कंपन्या अशा आहेत, ज्या लोकांना नोकरीसाठी येताना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र मागते. अशा परिस्थितीत हे सायबर गुन्हेगार तुमची माहिती एडीट करुन, ती अशा लोकांना विकू शकतात.

काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यामध्ये आरोपीने सिप्ला कंपनीच्या नावाचा वापर करुन औषधांची विक्री करत लोकांची फसवणूक केली. तपासादरम्यान माहिती मिळाली, आरोपी लोकांशी संपर्क साधण्यासाठी 40 बनावट बँक खाती आणि 40 बनावट सिमकार्ड वापरत होता. शिंत्रे म्हणाले की, आपल्या प्रमाणपत्रातील माहितीचा वापर करून, सायबर-क्रिमिनल्स बनावट कागदपत्रे देखील तयार करू शकतात, ज्याचा उपयोग बँक खाती उघडण्यासाठी आणि सिम कार्ड खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

लोकांना याच विषयावर सतर्क करण्यासाठी सायबर पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सायबर एक्पर्ट अंकुर पुराणिक यांनी सांगितले की लस प्रमाणपत्र चुकीच्या हातात पडल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. तसेच बऱ्याचवेळा पहिला डोस मिळाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते, ज्यावर दुसरा डोस कधी मिळणार याची माहिती असते. जर हे प्रमाणपत्र सायबर फ्रॉडच्या हाती लागले, तर तुम्हाला कॉल करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

आपल्याला जर लसीकरणाचे सर्टिफिकेट पोस्ट करण्याची खूप इच्छा असेल, तर आपण ते ब्लर करून पोस्ट केले पाहिजे. जेणेकरून कोणीही त्याचा तपशील वाचू शकणार नाही आणि जर ते वाचू शकले नाही तर त्याचा गैरवापरही होणार नाही.