दिलासादायक; देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना आपला देश करत आहे. यादरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. पण, सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 2 लाख 11 हजार 298 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3847 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 83 हजार 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच, काल सक्रिय रुग्णसंख्या 75,684 कमी झाली आहे.

दरम्यान देशभरात 26 मेपर्यंत 20 कोटी 26 लाख 95 हजार 874 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर काल दिवसभरात 18 लाख 85 हजार 805 लसीचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत 33 कोटी 70 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 22 लाख कोरोना चाचणीचे अहवाल तपासण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्यांहून अधिक आहे.

देशात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.5 टक्क्यांवर आहे, तर रिकव्हरी रेट 89 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 10 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येबाबत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

दुसरीकडे महाराष्ट्रात आज 24,752 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर आज 23,065 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे. राज्यात आज एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.