कुणाचा बाप मला अटक करू शकत नाही- रामदेव बाबा

अॅलोपथी हे मुर्खांचे शास्त्र असल्याची टीका करून चर्चेत आलेले योगगुरू रामदेव बाबा अॅलोपथी डॉक्टर्सच्या निशाण्यावर आले असतानाच रामदेव बाबांचे आणखी एक वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने चर्चेत आले आहे. ‘कुणाच्या बापाला रामदेवला अटक करण्याची हिम्मत नाही’ असे बाबांनी एका शो मध्ये सांगितले आहे.

रामदेव बाबांनी अॅलोपथी बाबत वादग्रस्त विधाने करून अॅलोपथी डॉक्टर्स, करोना योद्ध्यांचा अपमान केला आहे त्यामुळे करोनाशी रात्रंदिवस झुंज देत असलेल्या डॉक्टर्सच्या मनोबलावर विपरीत परिणाम होत आहे असा आक्षेप घेऊन इंडिअन मेडिकल असोसिएशन उत्तराखंड शाखेने रामदेव बाबांना महामारी कायद्यानुसार सरकारने अटक करावी अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना रामदेव बाबा बोलत होते.

रामदेवबाबा म्हणाले, माझ्या विरोधात सतत काही ना काही सुरूच असते. ठग रामदेव, महाठग रामदेव अश्या अनेक उपाधी मला मिळाल्या आहेत. आपल्या कडच्या लोकांना ट्रेंड चालविण्याची चांगली सवय झाली आहे आणि अश्या ट्रेंड मध्ये मी नेहमीच टॉपवर आहे. त्याबद्दल या लोकांचे अभिनंदन.

रामदेवबाबांनी अॅलोपथी जर सर्वशक्तिमान आणि सर्वगुण संपन्न असेल तर अॅलोपथी डॉक्टर कधीच आजारी पडता कामा नयेत असे विधान करून वादाला तोंड फोडले होते. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना पत्र लिहून, तुमचे वक्तव्य डॉक्टर्सचे मनोबल तोडणारे आहे असे सुनावले होते.