कुठून आला कोविड? ९० दिवसात शोधा, बायडेन यांचे गुप्तचर यंत्रणांना आदेश

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी गुप्तचर यंत्रणांना कोविड १९ चे जन्मस्थळ शोधण्यासाठीचे प्रयत्न वाढवा असे आदेश दिले आहेत. ९० दिवसात कोविड १९ कुठून आला याचा शोध लावा असे आदेश गुप्तचर यंत्रणांना देतानाचा बायडेन यांनी अमेरिकी प्रयोगशाळांनी या संदर्भात गुप्तचर यंत्रणांना मदत करावी असेही म्हटले आहे.

प्राण्याच्या माध्यमातून करोनाचे माणसात संक्रमण झाले की चीन मधील प्रयोगशाळेतून अपघाताने या विषाणूची साथ पसरली याचा परत खोल तपास घेतला जावा अश्या सूचना देतानाच बायडेन यांनी चीनने या आंतरराष्ट्रीय तपासात सहकार्य करावे असे अपील केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून लिक झाला नसल्याचा खुलासा यापूर्वी केला होता. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे निष्कर्ष पुन्हा तपासून पाहिले गेले पाहिजेत असे बायडेन यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने चीन प्रयोगशाळेला भेट देऊन गोळा केलेल्या डेटा मध्ये जनावरे तपासणी डेटाकडे दुर्लक्ष केले होते असे म्हटले जात आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने २०० पानी अहवाल सादर केला आहे मात्र त्यात अनेक त्रुटी असल्याचे म्हटले जात आहे. वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या गुप्तचर अहवालात हा विषाणू जगात पसरण्याच्या आधी वुहान प्रयोगशाळेत काम करणारे तीन चीनी संशोधक आजारी पडले होते आणि त्यांनी हॉस्पिटल सेवाची मागणी केली होती असे म्हटले गेले आहे.

कोविड १९ ची जगात १६.८५ कोटी लोकांना लागण झाली असून या साथीत ३५.०१ लाख लोकांचा बळी गेला आहे.