मुंबई महानगरपालिकेला लवकरच मिळणार 1 कोटी कोरोना प्रतिबंधक लसी


मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीच्या 5 कोटी डोसच्या महाराष्ट्र सरकारच्या जागतिक टेंडरला अद्यापपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही. याउलट, मुंबई महानगरपालिकेच्या एक कोटी कोरोना लसीकरता एकूण 8 पुरवठादारांनी ग्लोबल टेंडरला प्रतिसाद दिला आहे. पण पुन्हा एकदा 1 जूनपर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. तत्पूर्वी 25 तारखेपर्यंत निविदा दाखल करायच्या होत्या.

याबाबत माहिती देताना मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, लस पुरवण्याची इच्छा व्यक्त केलेल्या 8 लसी पुरवठादारांपैकी 7 जणांनी स्पुटनिक आणि एकाने फायजर व्हॅक्सिनची पूर्तता करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेने 12 मे रोजी जागतिक टेंडर काढले होते. तेव्हा 18 मे पर्यंत 5 लस पुरवठा करणाऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. या लसी पुरवठा करणाऱ्यांना कायदेशीर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 25 मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता मंगळवारी तीन नवीन लस पुरवठा करणाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निविदेत रस दाखवला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद देणाऱ्या लस पुरवठादारांसोबत मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त मनपा आयुक्त पी. वेलरासू, उप आयुक्त संजोग कबरे आणि सहकर्मी अधिकारी कायदा प्रक्रिया करण्याचे काम करत आहेत. सर्व पुरवठादारांच्या कागदपत्रांची नीट तपासणी करुन त्यांच्याकडून लसीच्या दराविषयी भाव करणे सुरू आहे.

मनपा आयुक्त चहल म्हणाले की, ही लस तयार करणारी कंपनी आणि पुरवठा करण्याची इच्छा करणारी कंपनी यांच्यातील व्यावसायिक संबंधांची चौकशी केली जात आहे, जेणेकरुन ही लस दिलेल्या कालावधीत पुरवली जाऊ शकेल की नाही? त्याबद्दल माहिती मिळू शकेल. यासह, किती दिवसात लसीचा पुरवठा होईल, किती लस दिल्या जातील, व्हॅक्सिनचा दर किती असेल आणि देय अटी शर्थी काय असतील? या महत्त्वाच्या बाबींचा अगदी बारकाईने आढावा घेण्यात येत आहे.