पाकिस्तानने जर देशावर हल्ला केला, तर त्यावेळी तो निर्णयसुद्धा राज्यांवर सोडणार का?


नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील अनेक राज्यांना लसीच्या बाबतीत वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करून 18 ते 44 वयाच्या नागरिकांचे लसीकरण गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. ही एकट्या दिल्लीचीच नव्हे, तर देशातील परिस्थिती आहे. नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्यापेक्षा जी आहेत तिच आम्हाला बंद करावी लागत असल्याची टीका केंद्र सरकारवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.


जगभरातील कंपन्या राज्यांना कोरोना लस पुरविण्यास तयार नाहीत. याबाबत केंद्राने हात वर केले असून कोरोना प्रतिबंधक लस केंद्र का खरेदी करत नाही? आणि आपण लसींची खरेदी राज्यांवर सोडू शकत नाही. सध्या कोरोनाविरोधात आपला देश युद्ध लढत आहे. पाकिस्तानने जर आपल्या देशावर हल्ला केला, तर याची जबाबदारी तुम्ही राज्यांवर सोडणार आहात का? स्वत:चे रणगाडे उत्तर प्रदेश खरेदी करणार आहे का? की स्वत:ची हत्यारे दिल्ली खरेदी करणार आहे? असा सवाल केजरीवालांनी मोदी सरकारला केला आहे.

माझ्या माहितीप्रमाणे लसीचा एक डोसदेखील देशातील कोणतेच राज्य खरेदी करू शकलेले नाही. राज्यांसोबत बोलण्यासही लसी बनविणाऱ्या कंपन्यांनी नकार दिला आहे. ही वेळ केंद्र आणि राज्य सरकरांनी एकत्र येऊन लढण्याची आहे. आपण वेगवेगळे काम करू शकत नाही. आपल्याला टीम इंडियासारखे काम करावे लागणार आहे. लोकांना लसी पुरविणे ही केंद्राची जबाबदारी आहे, राज्यांची नाही. जर आणखी उशिर झाला, तर माहित नाही आणखी किती जीव गमवावे लागतील, असा इशारा देखील केजरीवालांनी दिला आहे.