देशातील ‘या’ राज्याकडून सर्वाधिक कोरोना प्रतिबंधक लसींची नासाडी!


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाच्या संकटाविरोधात लढण्यासाठी सध्याच्या घडीला लसीकरण हे सर्वात प्रभावी हत्यार आहे. पण गेल्या काही दिवसात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे देशातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. देशातील अनेक राज्यात लसीकरण केंद्र देखील बंद आहेत. अशातच लस वाया घालवत असलेल्या राज्यांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. झारखंड आणि छत्तीसगड ही दोन राज्य या यादीत आघाडीवर आहेत. झारखंड राज्याने पुरवठा करण्यात आलेल्या एकूण लसींच्या ३७.३ टक्के लसी वाया घालवल्या आहेत. तर छत्तीसगडमध्ये एकूण लसींच्या ३०.२ टक्के लसी वाया गेल्या आहेत.


झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांव्यतिरिक्त तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात देखील लस वाया घालवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तामिळनाडूत १५.५ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १०.८ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये १०.७ टक्के एवढ्या लसी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात ६.३ टक्के लसी वाया गेल्या आहेत.


याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीट करत लसींची नासाडी होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. पण आकडेवारीत वाया घालवण्याचे प्रमाण चुकीचे आहे. आतापर्यंत एकूण लसींच्या ४.६५ टक्के लसी वाया गेल्या आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे कोविन पोर्टलवर योग्य डाटा पोहोचू शकला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.