राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा


मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांचे अहिंसा, शांती, करुणा व उपेक्षितांची सेवा हे संस्कार भारतातील समाजमनावर शतकानुशतके रुजले आहेत. आज करोनामुळे जग आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना भगवान बुद्धांची व्यापक समाज हिताची शिकवण विशेष प्रासंगिक आहे. बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व देश लवकर करोनामुक्त होवो अशी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तथागत गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहे, अशा शब्दांत बुद्धपौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, भगवान बुद्धांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजच्या घडीला अधिक समर्पक आहे. यातच त्यांच्या विचारांची सार्वकालिकता आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम आणि या पवित्र पर्वानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा.

तथागत गौतम बुद्धांनी मानवाला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला. त्यांनी दिलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच मानवजातीचं, अखिल विश्वाचं कल्याण सामावलं आहे. गौतम बुद्धांचे विचार मानवाचं जीवन कायम प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी कार्य केलं. अखिल मानवजातीला त्यांनी अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. आज जगावर कोरोनासारख्या महामारीचं संकट असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी जागतिक मदतीचं, विश्वशांतीचं, सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.