बीसीसीआयने रद्द केली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारी टी-२० मालिका


नवी दिल्ली – क्रीडा जगतावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम होत असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच क्रिकेट मालिका आणि लीग स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही लीगच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच बीसीसीआयने आणखी एक मालिका रद्द करण्याचीही घोषणा केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. एका अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारी टी-२० मालिका बीसीसीआयने रद्द केली आहे. ही मालिका भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर होणार होती. हा निर्णय आयपीएल २०२१मधील उर्वरित सामने खेळवणे बाकी असल्यामुळे घेण्यात आला आहे.

अनेक खेळाडू आणि कर्मचारी बायो बबलचे संरक्षण असूनही आयपीएल दरम्यान कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर आयपीएल पुढे ढकलण्यात आले. माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२१चे उर्वरित सामने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात यूएईमध्ये खेळले जातील. आयपीएल तीन आठवड्यांसाठी चालेल आणि १० दिवस डबल-हेडरचे सामने खेळवले जातील.

टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्यासाठी आयपीएलपेक्षाही उत्तम असू शकत नसल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार आयपीएल पूर्ण झाल्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा आठवडा किंवा दहा दिवसांत होईल, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसह मालिकादेखील नंतर खेळता येईल. सूत्रानुसार टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान भारत अतिरिक्त सामने खेळू शकेल. नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिकाही टाळता येऊ शकते.