सुबोध जयस्वाल सीबीआयचे नवे संचालक नियुक्त

केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचे पुढचे संचालक कोण याचे कुतूहल मंगळवारी संपले असून सीबीआयचे नवे संचालक म्हणून १९८५ बॅचचे आयपीएस सुबोध जयस्वाल यांची निवड केली गेली आहे. पराभवातून विजय, पडल्यावर पुन्हा नवीन जोमाने ठाम उभे राहणे आणि खूप काही गमावल्यावर पुन्हा मिळविणे या त्रयीवर जयस्वाल यांचे आयुष्य आधारलेले आहे. चार पंतप्रधानांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळालेले जयस्वाल एनडीए च्या परीक्षेत तीन वेळा अपयशी ठरले होते असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

झारखंडच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या सुबोध जयस्वाल यांनी बीए नंतर एमबीए केले आणि यूपीएससीची परीक्षा पास झाले तेव्हा कुठली नोकरी आपल्याला मिळणार हे स्पष्ट नव्हते असेही त्यांनी सांगितले. आज मात्र पोलीस विभागातील एकही महत्वाचा असा विभाग नाही जेथे सुबोध जयस्वाल यांनी महत्वाचे पद भूषविलेले नाही. त्यांनी जेथे जेथे महत्वाचे पद भूषविले तेथे स्वतःचा ठसा उमटवला आहे.

अतिशय स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी अशी त्यांची ओळख असून त्यांना २००९ मध्ये राष्ट्रपती पोलीस मेडल ने सन्मानित केले गेले आहे. गुप्तहेराचे मास्टर अशीही त्यांची ओळख असून त्यांनी रॉ मध्ये सुद्धा काम केलेले आहे.

मुंबई पोलीस विभागात त्यांनी अनेक महत्वाच्या केसेसचा तपास केला असून त्यात मुद्रांक शुल्क घोटाळा, २००६ मधले मालेगाव स्फोट, एल्गार परिषद भीमा कोरेगाव हिंसा अश्या अनेक केसेसचा समावेश आहे. पंतप्रधान, माजी पंतप्रधान, त्यांचे कुटुंबीय याना सुरक्षा पुरविणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या इंटेलिजन्स ब्युरो मध्येही त्यांनी वरच्या पदावर काम केले आहे.

वयाच्या २३ व्या वर्षी आयपीएस झालेल्या जयस्वाल यांचे पहिले पोस्टिंग नक्षलग्रस्त भागात झाले होते. महाराष्ट्र पोलिसात त्यांनी एसआयटी पासून मुंबई टेररिस्ट्स विरोधी दलात डीआयजी पदावर काम केले आहे.