रामदेवबाबांवर आयएमए लावणार १ हजार कोटीचा मानहानीचा दावा

योगगुरू रामदेव बाबा यांनी अॅलोपथी औधोधपचार आणि डॉक्टर्स वर टीका करून डॉक्टर्सना २५ प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान दिल्यावर उत्तराखंडच्या इंडिअन मेडिकल असोसिएशन शाखेने रामदेव बाबांवर १ हजार कोटींचा मानहानी दावा केला जाणार असल्याचे सांगितले आहे. असोसिएशनचे सचिव डॉ. अजय खन्ना या संदर्भात म्हणाले, रामदेव बाबांना अॅलोपथी मधले अ सुद्धा माहिती नाही. आम्ही त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ पण त्यापूर्वी त्यांनी आपली योग्यता सिध्द करावी.

डॉ. खन्ना म्हणाले आम्ही रामदेवबाबांना १५ दिवसाची मुदत दिली आहे. या वेळात त्यांनी केलेल्या विधानांबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहोत. रामदेवबाबांना अॅलोपथीचे ज्ञान नाही तरीही ते डॉक्टर विरुध्द वादग्रस्त विधाने करत आहेत. करोना काळात रात्रदिवस रुग्णसेवेत असलेल्या डॉक्टर्सचे मनोबल त्यामुळे कमी होत आहे. आजार आणि उपचार या बाबत बाबा नेहमीच अवैद्यानिक दावे करतात. कॅन्सरवर उपचाराचा दावा सुद्धा ते करतात. असे असेल तर त्यांना नोबेल मिळायला हवे.

करोना काळात असली विधाने करणाऱ्या बाबांवर वास्तविक सरकारने महामारी कायद्यानुसार कारवाई करायला हवी अन्यथा आम्ही केस दाखल करणार आहोत.