‘ द साकुरा’ गुलाबी हिऱ्याने मोडले किमतीचे रेकॉर्ड

हॉंगकॉंग येथील एका लिलावात ‘ द साकुरा’ नावाच्या गुलाबी हिऱ्याने सर्वाधिक किंमत मिळवून जगातील सर्वात किमती हिरा असे रेकॉर्ड बनविले आहे. १५.८१ कॅरटचा गुलाबी जांभळ्या रंगाचा हा हिरा हॉंगकॉंग येथे झालेल्या लिलावात २९.३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २१३ कोटी रुपयांना विकला गेला. प्लॅटीनम अंगठी मध्ये हा हिरा जडविला गेला आहे. क्रिस्ती या प्रसिद्ध लिलाव कंपनीने हा लिलाव केला.

रविवारी झालेल्या या लिलावात एका आशियाई व्यक्तीने या हिऱ्याची खरेदी केली. ही खरेदी खासगी असल्याने व्यक्तीचे नाव जाहीर केले गेले नाही. हा हिरा फॅन्सी विविड कॅटेगरी मध्ये मोडतो. म्हणजे असे हिरे निर्दोष असतात आणि त्याच्या अंतर्गत काही बारीकसा दोष असेल तर शक्तीशाली मायक्रोस्कोप खालीच तो ओळखता येतो.

जगात गुलाबी रंगाचे १० कॅरेट वरचे हिरे सापडण्याचे प्रमाण फक्त १ टक्का आहे त्यातील ४ टक्के फॅन्सी विविड कॅटेगरीचे असतात. ख्रिस्टीने ‘ द साकुरा’ चा लिलाव हा इतिहासातील महत्वपूर्ण अध्याय असल्याचे म्हटले आहे. हा हिरा ४.२ कॅरेटच्या हृदयाच्या आकाराच्या अतिशय सुंदर गुलाबी हिऱ्याच्या अंगठी बरोबर विकला गेला. या दुसऱ्या हिऱ्याला ६६ लाख अमेरिकन डॉलर्स किंमत मिळाली.

२९.३ दशलक्ष डॉलर्सला विकल्या गेलेल्या ‘द साकुरा’ ने १४.८ कॅरटच्या ‘द स्पिरीट ऑफ द रोझ’ या हिऱ्याचे किमतीचे रेकॉर्ड मोडले. नोव्हेंबर मध्ये स्वित्झर्लंडच्या जीनोवा येथे सोथबीने केलेल्या लिलावात ‘ द स्पिरीट ऑफ रोझ’ ला २७ दशलक्ष डॉलर्स किंमत मिळाली होती.