देशातील कोरोनाबाधितांचा आलेख उतरणीला; 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच 2 लाखांहून कमी रुग्णांची नोंद


नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव देशात दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात एक लाख 96 हजार 427 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी 13 एप्रिल रोजी देशात दोन लाखांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी देशात 24 तासांत एक लाख 84 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. काल (सोमवारी) देशात 3511 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तीन लाख 26 हजार 850 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

भारतात काल (सोमवारी) कोरोनामुळे 20 लाख 58 हजार 112 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. काल देशात एकूण 33 कोटी 25 लाख 94 हजार 176 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्याचे भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने (ICMR) सांगितले आहे.

तर दूसरीकडे महाराष्ट्रात काल दिवसभरात 42,320 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 22,122 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल 361 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. राज्यात काल एकूण 3,24,580 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.51 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 361 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,32,77,290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,02,19 (16.83 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,29,301 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 24,932 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.