रत्नागिरीत उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; ऑपरेशन लोटसची पुन्हा चर्चा


सिंधुदुर्ग : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच गुप्त भेट घेतली. हा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाल्याचे कळते. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात राजकीय घडामोडी झाल्याचे आता समोर आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या आधीच उदय सामंत हे शासकीय विश्रामगृहात पोहोचले होते. इतरांच्या भेटीगाठी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचे कळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 21 मे रोजी कोकण दौरा होता. परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 20 मे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उदय सामंत रत्नागिरीत पोहोचले होते. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु आपल्यावर लक्ष ठेवा, असे उदय सामंत फडणवीसांना म्हणाल्याचे कळते.

सामंत-फडणवीस यांची भेट झाल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनीच केला. सिंधुदुर्गात तोक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

निलेश राणे यांच्या या दाव्यामुळे एकच चर्चा सुरु असून तोक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने भेट घेण्याचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत आली. तेव्हापासूनच राज्यात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे ऑपरेशन लोटससाठी ही भेट झाली का अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात राजकीय भूकंप घडणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.