अ‍ॅलोपॅथी पद्धतीने उपचार सुरु असलेल्या पतंजलीच्या दुग्ध व्यवसाय प्रमुखाचा कोरोनामुळे मृत्यू


नवी दिल्ली – कोरोनामुळे योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीतील दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रमुख असणाऱ्या सुनील बन्सल यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी यासंदर्भातील पत्रक कंपनीने जारी केले आहे. तसेच अ‍ॅलोपॅथी पद्धतीने बन्सल यांच्यावर उपचार सुरु होते आणि त्यामध्ये कंपनीने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचे पतंजलीने स्पष्ट केले आहे.

५७ वर्षीय बन्सल हे पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रमुख होते. १९ मे रोजी बन्सल यांचा मृत्यू झाल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. डेअरी सायन्स विषयाचे बन्सल हे तज्ज्ञ होते. ते २०१८ पासून पतंजली कंपनीसोबत काम करत होते. जेव्हा कंपनीने इतर बड्या कंपन्यांना आव्हान देण्यासाठी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ विकण्यासंदर्भातील घोषणा केली, तेव्हा बन्सल यांच्याकडे कंपनीने नेतृत्व सोपवले होते. पतंजलीने दही, ताक आणि चीजसारख्या वस्तू बाजारात आणण्याची घोषणा केली होती.

बन्सल यांचे १९ मे रोजी कोरोनामुळे जयपूरमधील राजस्थान रुग्णालयामध्ये निधन झाले. त्यांची पत्नी याच रुग्णालयामध्ये राजस्थान सरकारने नियुक्त केलेल्या वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर बन्सल यांच्या मृत्यूची चर्चा पुन्हा सुरु झाली.

पण कंपनीने रामदेव यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या वादाचा आणि मृत्यूचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. अ‍ॅलोपॅथी औषधोपचार त्यांच्यावर सुरु होते. त्यांची पत्नीच यासंदर्भात निर्णय घेत होती. त्यांच्या औषधोपचारांमध्ये पतंजलीची कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती. आम्ही केवळ त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या पत्नीच्या संपर्कात असल्याचे कंपनीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.