100 कोटींच्या वसुलीप्रकरणी पाच बार मालकांची चौकशी करणार ईडी


मुंबई : आता मुंबईतील पाच बार मालकांची महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी चौकशी होणार आहे. या बार मालकांना अंमबजावणी संचालनालयाने समन्सही बजावले असल्यामुळे या प्रकरणात ईडी अॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

बार मालक आणि इतरांकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र लिहिल्यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तसेच आता या प्रकरणाची सीबीआय देखील चौकशी करत आहे.

दर महिन्याला अडीच लाख रुपये बार मालक देत होते, असा आरोप बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने केला होता. सेवेत असताना सचिन वाझे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते. सचिन वाझेला मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर आता ईडी देखील प्रकरणाचा तपास करत आहे. ईडीने दोन आठवड्यांपूर्वी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सचिन वाझेच्या दाव्यानुसार हे बार मालक त्यांना त्रास होऊ नये म्हणून दर महिन्याला अडीच लाख रुपये देत होते. त्यानुसार ईडीने पाच बार मालकांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना समन्स बजावले आहे.

ईडी या प्रकरणाचा आर्थिक व्यवहाराच्या अँगलने तपास करत आहे. तसेच ईडी सचिन वाझे, अनिल देशमुख आणि त्यांच्याशी संबंधितांची चौकशी करणार आहे. त्याचबरोबर परमबीर सिंह आणि त्यांच्या निकटवर्तींचे आर्थिक व्यवहार देखील ईडी तपासणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. ईडीने मागील आठवड्यात अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला होता. जयश्री पाटील यांनीही अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक होत्या. या याचिकेवर निकाल देताना हायकोर्टाने सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.