कोरोनावर आता ‘कॉकटेल’ इलाज! एका डोससाठी मोजावे लागणार तब्बल ५९ हजार ७५० रुपये


नवी दिल्ली – संपूर्ण जग सध्या कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे. या लढाईत कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण शस्त्र म्हणून समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन मोठ्या प्रमाणावर वापरले जात असताना आता त्यासोबतच नवीन कॉकटेल उपचार पद्धती भारतात उपलब्ध होणार आहे.

कोरोनाची लागण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झाल्यानंतर त्यांच्यावर या उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता. Casirivimab आणि Imdevimab या दोन प्रकारच्या अँटीबॉडीजचे कॉकटेल करून हे कॉकटेल इंजेक्शन तयार करण्यात येते. तब्बल ५९ हजार ७५० रुपये एवढी या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

ही दोन्ही अँटीबॉडी असलेली इंजेक्शन्स रॉश इंडिया या औषध निर्मिती कंपनीने बनवली आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या वर्षी कोरोना उपचारांसाठी ही पद्धत वापरण्यात आली होती. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, कासिरिविमॅब (Casirivimab) आणि इमडेविमॅब (Imdevimab) यांचे प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस दोन्ही इंजेक्शनच्या कॉकटेल पॅकिंगमध्ये आहेत. या प्रत्येक डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये एवढी आहे. दोन रुग्णांना या एका कॉकटेल पॅकिंगमधून डोस देता येऊ शकतील. एका कॉकटेल पॅकिंगची कमाल किंमत १ लाख १९ हजार ५०० एवढी आहे.

भारतात सध्या या कॉकटेल इंजेक्शनची पहिली बॅच दाखल झाली असून जून महिन्यात दुसरी बॅच येणार असल्याचे सांगितले जात आहे. हे कॉकटेल भारतीय बाजारपेठेत सिप्ला कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या दोन्ही बॅचमुळे जवळपास २ लाख रुग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार असल्याचे सिप्लाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, रॉश इंडियाकडून हे कॉकटेल इंजेक्शन कोणत्या रुग्णांवर वापरता येणार, याविषयी देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सौम्य किंवा मध्यम प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना याचे डोस देता येऊ शकतील. हे डोस १२ वर्षे वयापेक्षा जास्त असणाऱ्या रुग्णांनाच देता येतील. त्याचबरोबर हे डोस देण्यासाठी रुग्णाचे किमान वजन ४० किलो असणे आवश्यक आहे. ज्या रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे, अशा रुग्णांना हे इंजेक्शन देता येईल. पण, इंजेक्शन देण्यासाठी रुग्ण ऑक्सिजनवर नसावा, असे देखील कंपनीकडून नमूद करण्यात आले आहे.

हे इंजेक्शन कोरोना गंभीर होण्याचा धोका असणाऱ्या हाय रिस्क रुग्णांना वेळीच दिल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता कमी होत असून अशा रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील ७० टक्क्यांनी कमी होत असल्याचे दिसून आल्याची माहिती एएनआयने आपल्या वृत्तात दिली आहे.