राजभवनातून गायब झालेली 12 सदस्यांची यादी सापडली; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया


मुंबई : 12 सदस्यांची राजभवनातून गायब झालेली यादी अखेर सापडली आहे. राजभवनातच गेल्यावर्षी मंत्री अनिल परब, अमित देशमुख आणि नवाब मलिक यांनी दिलेली 12 आमदारांची यादी सुरक्षित असल्याची माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली आहे. सहा महिने उलटून गेले तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 आमदारांची नियुक्ती केलेली नाही. हे प्रकरण आता न्यायालयातही आहे.

जेव्हा राज्यपाल सचिवालयाकडे ही यादी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितली, तेव्हा ती उपलब्ध नसल्याचे उत्तर सचिवालयाने दिले होते. सामनाच्या अग्रलेखातूनही ही फाईल भुतांनी पळवल्याची टीका काल केली होती. माहिती अधिकारात ज्या अधिकाऱ्याकडे ही माहिती मागवली त्या अधिकाऱ्यांकडे ती फाईल उपलब्ध नव्हती. त्यांनी फाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात ही माहिती उपलब्ध करून दिली नसल्याचे राजभवनातील सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत बोलताना म्हणाले की, फाईल मिळाली याचा आनंद आहे. पण त्या फाईलवर राज्यपाल ज्यावेळी सही करतील त्यावेळी संपूर्ण राजभवनात आम्ही पेढे वाटू. फाईल मिळाली म्हणजेच, ती भूतांनी पळवलेली नाही. भूते असतील तर ती त्यांच्या आसपास असतील.

प्रश्न एवढाच आहे, जो उच्च न्यायालयानेही विचारला आहे की, याप्रकरणी अद्याप निर्णय का होत नाही? ती पाईल काय बोफर्सची फाईल आहे, की राफेलची आहे? कसली फाईल आहे? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने एकमताने मंजूर करुन 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सुचवलेल्या नावांची ती फाईल आहे. जर त्या फाईलवर एवढ्या दिवसांत जर निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेस नाही. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी ती गतिमानता त्यांच्या कामात जर दाखवली, तर नक्कीच महाराष्ट्राची परंपरा गतिमान होईल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.