घोड्याच्या अंत्ययात्रेत अभूतपूर्व गर्दी- पूर्ण गाव केले सील

एखाद्या प्रतिष्ठित, मान्यवर सेलेब्रिटी, नेत्याचे निधन झाले तर त्यांच्या अंत्ययात्रेत प्रचंड जनसमुदाय जमतो हे नेहमीच अनुभवास येते. पण आता करोना मुळे सरकारने ज्या गाईडलाईन जारी केल्या आहेत त्यामुळे २० माणसांपेक्षा अधिक लोकांना अंत्यसंस्कार मिरवणुकीत सामील होता येत नाही. मात्र हे सर्व नियम ढाब्यावर बसवून बेळगाव मध्ये एका घोड्याच्या अंत्ययात्रेत अलोट जनसमुदाय लोटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हे गाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्यातील गोकाक येथील एका धार्मिक स्थळावरील घोडा मरण पावला. स्थानिक मठात त्यामुळे गर्दी व्हायला सुरवात झाली. हा घोडा दिव्य शक्ती असलेला होता अशी भाविकांच्या मनात भावना होती. त्यामुळे आसपासच्या गावातून सुद्धा लोक घोड्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी करू लागले. गाड्यांचे ताफे आले. करोनाची भीती जनमानसातून जणू पुसली गेली आणि प्रचंड गर्दी एकत्र जमली.

शेवटी प्रशासनाने ४०० घरे असेलेले हे संपूर्ण गाव सील केले. आता येथील सर्व नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असून स्थानिक प्रशासनाने लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १५ आयोजकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे असे समजते.