भारतात ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या उत्पादनाला झाली सुरुवात


नवी दिल्ली – रशियन लस असलेल्या ‘स्पुटनिक व्ही’चे भारतीय कंपनी पॅनासिया बायोटेकने उत्पादन सुरु केले आहे. हे उत्पादन रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडच्या मदतीने सुरु करण्यात आले आहे. स्पुटनिव्ह व्ही लसीचे वर्षाला १० कोटी डोस पॅनासिया कंपनी तयार करणार आहे. लस निर्मितीसाठी आरडीआयएफ आणि पॅनासिया बायोटेकने करार केला होता. त्या करारानुसार लस निर्मिती सुरु झाली आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

हिमाचल प्रदेशातील बद्दी कारखान्यात पॅनासिया बायोटेक कंपनीने स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती सुरु केली आहे. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लसीची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता पारखली जाणार आहे.

आम्ही भारतात पॅनासिया बायोटेकसोबत उत्पादन सुरु केले आहे. यामुळे देशातील कोरोना स्थितीशी लढण्यात मदत होणार आहे. भारतात लसींची पूर्तता झाल्यानंतर इतर देशांमध्ये त्याची निर्यात केली जाणार असल्याचे आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल्ल डमित्रिव यांनी सांगितले आहे.

भारतात स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती सुरु झाल्यामुळे त्याचा भारताला फायदा होणार आहे. लसीकरण मोहीम वेगाने झाल्यास पुन्हा सामान्य जीवन जगता येईल, असं पॅनासिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी सांगितले आहे.