Indian Idol मध्ये अलिबागसंदर्भात टिप्पणी केल्याप्रकरणी मनसे आक्रमक


मुंबई : इंडियन आयडॉलचा सध्याचा नवा सीझन सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी अमितकुमार यांनी किशोरकुमार यांच्या गाण्यावर झालेल्या शोबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सध्या हा शो गाण्यापेक्षा प्रेमप्रकरणावर जास्त केंद्रित झाल्याची टीका या स्पर्धेचा पहिला विजेता अभिजीत सावंत यानेही केली होती. आता या शोचा होस्ट आदित्य नारायणच्या एका टिप्पणीने पुन्हा एकदा नवा वाद उद्भवला आहे.

सध्या दमण येथे या शोचे चित्रिकरण सुरू आहे. आदित्य नारायणने रविवारी झालेल्या कार्यक्रमात अलिबाग से आया हूं क्या.. अशा अर्थाची टिप्पणी केली. साहजिकच यामुळे अलिबागकर नाराज झाले आहेत. मनसे चित्रपट सेनेच्या अमेय खोपकर यांनी याची दखल घेतली आणि त्यांनी तातडीने फेसबुक लाईव्ह करवी काही गोष्टी सांगितल्या.

या लाईव्हमध्ये त्यांनी या शोबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर, जर या मंचावरून हे वाक्य बोलले गेले, असेल तर त्याच मंचावरून त्याची माफीही मागितली गेली पाहिजे, असा आग्रह धरला आहे. खोपकर यांनी या लाईव्हमध्ये आपले बोलणे आदित्य यांचे वडील प्रख्यात गायक उदित नारायण यांच्याशीही झाल्याचे सांगितले आहे.

खोपकर याबद्दल माहिती देताना म्हणाले, मी आदित्यच्या या वाक्याबद्दल उदित नारायण यांच्याशी बोललो आहे. आदित्यच्या अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून येऊ लागल्या असल्याची कल्पना मी त्यांना दिली आहे. त्यांनी तशी कल्पना आपल्या मुलाला द्यावी याबद्दलही हे बोलणे झाल्याची माहीती त्यांनी दिली. त्याचबरोबर, यापूर्वीही अलिबागकरांचा असा अपमान झाला आहे.

वारंवार याबद्दल कल्पना देऊनही अलिबागकरांचा अपमान केला जातो आहे. आधी विनंती मग ताकीद आणि शेवटी कानाखाली आवाज अशी आपल्या कामाची पद्धत असते. आता पहिल्या दोन गोष्टी आपण केलेल्या आहेत. यापुढे असे काही झाले तर थेट कानाखालीच वाजवली जाईल याची नोंद सर्वांनी घ्यावी, असा इशाराही खोपकर यांनी दिला. यामुळे अलिबागकरांना नाहक मनस्ताप झाला असल्याची कल्पना आपल्याला असून, आपल्याला जे शक्य आहे ते आपण करू याची, ग्वाहीही खोपकर यांनी दिली आहे.