दुसऱ्या लाटेत सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली सर्वाधिक पसंती


देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडालेला असतानाच अनेक राज्यांमध्ये कोरोना या विषयावरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण होते हे जाणून घेण्यासाठी एका ज्येष्ठ पत्रकाराने घेतलेल्या ट्विटरवरील जनमत चाचणीमध्ये सर्वाधिक म्हणजेच ६२ टक्क्यांहून अधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. सध्या शिवसेना समर्थकांकडून या पोलचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्वात चांगल्या पद्धतीने काम करणारे देशातील मुख्यमंत्री कोण असा ट्विटर पोल ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी घेतला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांनी सर्वोत्तम नियोजन केले?, असा प्रश्न विचारत चावला यांनी दोन पोल घेतले होते. एका पोलला चारच पर्याय देता येत असल्यामुळे त्यांनी दोन पोल घेत आठ मुख्यमंत्र्यांचे पर्याय दिले होते.


दोन लाख ६७ हजार २४८ जणांनी पहिल्या पोलमध्ये आपले मत नोंदवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यापैकी ६२.५ टक्के मते मिळाली. म्हणजेच उद्धव ठाकरे यांना दोन लाख ६७ हजार २४८ जणांपैकी एक लाख ६७ हजार ३० मते मिळाली. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३१.६ टक्के, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ४.६ टक्के आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना १.३ टक्के मत मिळाली. म्हणजेच योगी यांना एकूण ८४ हजार ४५० मते मिळाली. केजरीवाल यांना १२ हजार २९३ तर विजयन यांना ३ हजार ४७४ मते मिळाली.


याच प्रश्नावरआधारीत दुसऱ्या पोलममध्ये एकूण दोन लाख ३४ हजार २६१ जणांनी आपले मत नोंदवले. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ४९ टक्के मते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मिळाली. त्या खालोखाल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना ४८.५ टक्के मत मिळाली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या वाट्याला १.७ तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना केवळ ०.५ टक्के मते मिळाली. म्हणजेच शिवराजसिंह चौहान यांना १ लाख १४ हजार ७८८ मते मिळाली. त्या खालोखाल पटनायक यांना १ लाख १३ हजार ६१६ मते, तर अमरिंदर सिंग यांना ३ हजार ९८२ मते मिळाली. येडियुरप्पा यांच्या वाट्याला अवघी १ हजार १७१ मते आली. याच पोलच्या आधारे देशामध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान कामगिरी करणाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरल्याचा प्रचार आता शिवसेनेचे समर्थक सोशल मीडियावर करत आहेत.