कोरोना संकटात औषधांचा साठा केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून गौतम गंभीरच्या चौकशीचा आदेश


नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहते. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या फॅबीफ्लू औषधाचे गौतम गंभीरकडून वाटप केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय औषध नियामक मंडळाला तपास करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात गौतम गंभीर आणि अन्य दोघांविरोधात कोरोना संकटात औषधांचा साठा करत त्याचे वाटप केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने हा आदेश याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिला आहे.

भलेही गौतम गंभीरचा उदेश्य चांगला असू शकतो, पण त्याने मोठ्या प्रमाणात औषधं खरेदी करण्याची चूक केल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जो काही तपास करायचा आहे, तो औषध नियामक मंडळाकडून केला जाईल. गौतम गंभीर एक राष्ट्रीय खेळाडू राहिला आहे. त्याचा हेतू चांगला असेल याबाबत काही दुमत नाही पण ज्या पद्धतीने त्याने केले ते चुकीचे आहे. जरी त्याच्याकडून हे नकळत झाले असले तरी ते चुकीचे असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आपल्या संस्थेमार्फत डॉ गार्ग यांनी दिलेल्या प्रिस्किप्शननुसार फॅबीफ्लूच्या २६८२ पाकिटांची गौतम गंभीरने खरेदी केल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणले. स्टेटस रिपोर्टनुसार, वाटप केल्यानंतर उरलेली २८५ पाकिटे आरोग्य सेवा संचालनालयाकडे सोपवली. एका प्रिस्किप्शनवर विक्रेत्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात फॅबीफ्लू कसे काय पुरवण्यात आले याचा तपास होणे गरजेचे असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

तपासासाठी औषध नियामक मंडळाला न्यायालयाने एका आठवड्याचा वेळ दिला आहे. या संपूर्ण साखळीत नेमकी कोणावर कारवाई करावी याचा शोध घ्या, असे उच्च न्यायालयाने औषध नियामक मंडळाला सांगितले आहे.