मुलेट हेअर कट आणि स्किनी जीन्सवर किम जोंग उनने घातली बंदी

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने देशातील नागरिकांवर अगोदरच अनेक बंधने घातली आहेत. आता त्यात आणखी नव्या बंधनांची भर पडली असून देशात स्किनी, फाटक्या जीन्स घालणे आणि मुलेट हेअरकटवर बंदी घातली गेली आहे. हा नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षा सुनावली जाणार आहे.

नवे नियम युवकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केले गेल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार पाश्चिमात्य संस्कृतीचा युवा पिढीवर परिणाम होईल आणि त्यामुळे आपल्या सत्तेला धोका निर्माण होईल अशी भीती किम जोंग उनच्या मनात आहे. स्किनी, फाटक्या जीन्स, फॅशनेबल हेअरस्टाईल ही भांडवलशाही लाईफस्टाईलचा वाढता प्रभाव या दृष्टीकोनातून पहिली जाते. स्टेट न्यूज पेपर द रुडोंग सिनमुन नुसार आपल्या परंपरागत जीवनशैलीचे पालन केले गेले नाही तर आर्थिकदृष्ट्या आणि सुरक्षा दृष्टीने मजबूत असलेला देश सुद्धा कोसळून पडतो. त्यामुळे पाश्चात्य देशांचे अनुकरण करू पाहणाऱ्या लोकांना कडक शासन करण्याकडे सरकारचा कल आहे.

उ. कोरियात सरकारने १५ प्रकारचे हेअरकट ठरवून दिले आहेत. त्याबाहेर वेगळा हेअरकट करणे कायद्याविरोधात आहेत. मुलेट हा आजचा हेअरकटचा नवा ट्रेंड तरुणाईत विशेष लोकप्रिय आहे. यात पुढचे केस छोटे ठेऊन मागचे केस मोठे, लांब ठेवले जातात. कोरियात कान, नाक वा शरीराच्या इतर अवयवांवर पिअर्सिंग म्हणजे टोचून घेण्यास बंदी आहे.