कसे विरजले गेले पहिले दही?

भारतीय संस्कृती असो वा अन्य कुठली संस्कृती. जगभरात बहुतेक ठिकाणी रोजच्या जेवणात दह्याचा समावेश असतो. आता भारतीयांचा दह्याशी अधिक गहिरा संबंध आहे. कारण श्रीकृष्ण आणि दही, लोणी याचे एक अतूट नाते आहे. तसेच भारतीय संस्कृती मध्ये कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर पडताना, परीक्षेला जाताना किंवा सैनिक युद्धासाठी जाताना हातावर दही साखर घालण्याची प्रथा आहे. अनेक हिंदू देवी देवतांच्या नैवेद्यात दही असते. आपल्याकडे आदल्या दिवशीचे दही दुधात घालून त्याचे विरजण लावून दही बनविले जाते. पण प्रश्न येतो तो असा कि विरजणासाठी तरी पहिले दही कसे उपलब्ध झाले?

आधुनिक जगात दही प्रथम कुठे बनले यावर अनेक वाद आहेत. त्यातील दोन मुख्य दावे असे. एका दाव्यानुसार युरोपीय देश बुल्गारीया मध्ये प्रथम दही बनविले गेले. दुसऱ्या दाव्यानुसार मध्य पूर्वेतील देशात पहिले दही बनले. बीबीसीच्या रिपोर्ट नुसार चार हजार वर्षापूर्वी बुल्गारीया मध्ये फिरत्या जमातीने दही बनविण्याची पद्धत शोधून काढली.

त्या काळी दुध जास्त टिकावे म्हणून जनावरांच्या कातड्याच्या पिशवीत भरून ठराविक तापमानात साठवले जाई. दुधापासून दही बनण्यासाठी एक बॅक्टेरिया कारणीभूत असतो याचा शोध वैज्ञानिक स्तोमेन ग्रिगोरोवा याने लावला आणि त्या बॅक्टेरियाला लॅक्टोबॅसील बुल्गारीकस असे नाव दिले. बुल्गारीयान नागरिक दीर्घायुषी असतात त्यामागे हाच बॅक्टेरिया कारणीभूत आहे असे मानले जाते. आजही बुल्गारीया मधील दह्याला जगभर मागणी आहे.