मास्क सक्ती हटली, लिपस्टिक व्यवसायाला आले उधाण

अमेरिकेने आता सार्वजनिक जागी मास्क बंदी मागे घेतल्याने लिपस्टिक, लीप लायनर, ग्लॉस, कलर  अशी उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांना पुन्हा चांगले दिवस येऊ लागले आहेत. अमेरिकेत गेले वर्षभर करोना मुळे मास्क बंधनकारक होता. याचा सर्वाधिक फटका सौंदर्यप्रसाधने क्षेत्राला, त्यातही लिपस्टिक आणि तत्सम उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांना सोसावा लागला होता. मास्क बंदी उठताच महिला वर्गाने नवीन ट्रेंडी लिपस्टिक्स आणि मेकअप साहित्याची जोरदार खरेदी सुरु केली आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिव्हेंशन विभागाने ज्या नागरिकांचे कोविड १९ लसीचे दोन्ही डोस झाले आहेत त्यांना मास्क वापरातून सुटका दिली आहे. गतवर्षी लीप कलर, ग्लॉस, लिपस्टिक, खरेदी मास्क वापर बंधन असल्याने जवळ जवळ बंद होती. एक तर लिपस्टिक मुळे मास्क खराब होतात आणि मेकअप चेहऱ्यावर पसरतात. यामुळे महिलांनी सौंदर्यप्रसाधन खरेदीवरील खर्च आवरता घेतला होता.

अमेरिकन बाजार रिसर्च संस्था आयआरटी ने गेल्या १८ दिवसात ३.५० कोटी डॉलर्स किमतीची प्रसाधने विकली गेल्याचा दावा केला असून गेल्या वर्षी झालेल्या विक्रीपेक्षा ही विक्री ८० टक्के अधिक असल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०२० पासून लिपस्टिक, मेकअप सामानाची विक्री वेगाने घटली होती. त्यात फक्त ओठांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रसाधनात १५ टक्के घट झाली होती आणि या प्रसाधनांच्या किमतीत २८ टक्के घट नोंदविली गेली होती. २०२१ मध्ये सुद्धा ही घट कायम होती. पहिल्या तिमाहीत ओठासाठीच्या प्रसाधनात २४ टक्के घट नोंदविली गेली होती.

या काळात मास्क वापरणे बंधनकारक होते. पण डोळे उघडे राहत असल्याने डोळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रसाधनांची विक्री वाढली होती. २०२० मध्ये ही वाढ २०४ टक्के होती. आता अमेरिकेतील जनजीवन सुरळीत होऊ लागल्याने पुन्हा एकदा सण, उत्सव, विवाह समारंभ सुरु होतील आणि त्यामुळे मेकअप साहित्य व्यवसायात पुन्हा तेजी येईल असे अनुमान आहे.