पहिलवान सुशीलकुमारला सहा दिवसांचा रिमांड

ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा प्रसिध्द कुस्तीगीर सुशीलकुमार याला अखेर दिल्ली पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलिसांनी १२ दिवसांचा रिमांड मागितला होता मात्र कोर्टाने ६ दिवसांचा रिमांड मंजूर केला असल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती पदके जिंकून देशाचे नाव रोशन करणारा सुशीलकुमार १८ दिवस फरारी होता. त्याच्यावर कुस्तीगीर सागर धनखड याच्या हत्येचा आरोप आहे. विशेष म्हणजे सुशीलकुमार याला अटक झाली त्या दिवशी जागतिक कुस्ती दिन होता.

सुशीलकुमार बरोबर त्याचा पीए अजय यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या बाहेरच्या भागात पोलिसांनी सुशीलकुमार आणि अजय यांना पकडले. सुशीलकुमार याला अटक झाली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर टॉवेल टाकून आणि त्याचे दोन्ही हात पकडून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियम मध्ये पहिलवानांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत सुशीलकुमार सामील होता. त्याच्या पत्नीच्या नावावर एक फ्लॅट असून हा फ्लॅट सागर धनखड याने भाड्याने घेतला होता पण दोन महिने त्याने भाडे भरले नव्हते. त्यातून ही बाचाबाची झाली आणि त्यात पाच पहिलवान गंभीर जखमी झाले. त्यातील सागरचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ही माहिती मिळताच सुशीलकुमार फरारी झाला होता.

पोलिसांच्या तपासात सुशीलकुमारला आणि त्याच्या साथीदाराला एका व्यक्तीने १० सिम उपलब्ध करून दिली होती. त्याच्या सहाय्याने इंटरनेट कॉल करून सुशील आणि त्याचा साथीदार जवळच्या लोकांच्या संपर्कात होते आणि तपास माहिती घेत होते. शनिवारी सुशीलकुमार कडचे पैसे संपले तेव्हा तो दिल्लीत आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.