अमेरिकेत गेली ४० वर्षे व्यवसायात असलेली कोविड

गतवर्षीपासून धुमाकूळ घातलेल्या करोना विषाणूचे नामकरण कोविड १९ असे झाले आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याला महामारी किंवा मोठी साथ असे घोषित केले. तेव्हापासून कोविड नाव घेतले जात नाही असा एकाही देश पृथ्वीतलावर नसेल. पण अमेरिकेत अरिझोना राज्यात टेम्पे शहराला कोविडची ओळख गेल्या चाळीसपेक्षा अधिक वर्षांपासून आहे हे सांगितले तर खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. येथे गेली ४० वर्षे कोविड इंक नावाची कंपनी आहे. ही कंपनी ऑडीओ व्हीजुअल वॉल प्लेट्स आणि केबल्स तयार करून जगभरात त्याची विक्री करते. पण ही कंपनी चर्चेत आली ती गेल्या वर्षी.

त्याचे असे झाले की कंपनीचे सीईओ नॉर्म कार्सन फेब्रुवारी २०२० मध्ये अॅमस्टरडॅम येथे एका ऑडीओ व्हीज्यूअल शो मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी फोटो सेशन झाले. हा दिवस सुद्धा अन्य दिवसांप्रमाणे सर्वसामान्य असेल अशी त्यांची कल्पना होती. म्हणजे लोकांना प्रशिक्षण दिले जाईल, ग्राहकाच्या भेटी होतील वगैरे. पण त्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ महामारी म्हणून घोषित केली.

कार्सन सांगतात नशिबाने आमची कंपनी वितरकांच्या माध्यमातून आमच्या डीलर्सशी संबंध ठेवते. त्यामुळे अनेकांना कोविड नावाची कंपनी आहे याचीच माहिती नव्हती. पण गतवर्षी पासून परिस्थिती बदलली आहे. आमची कंपनीही आता चर्चेत आली आहे. यामुळे अनेक मजेदार प्रसंग घडत आहेत. नाव वाचून काही नागरिकांनी येथे करोना लस दिली जाते का अशी चौकशी केली. काही लोकांनी कंपनीची टॅग लाईन बदला असा सल्ला दिला पण कंपनीचे नाव बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.