जास्त जेवल्यानंतर उद्भवणाऱ्या पोटफुगी साठी काय करावे?


एखाद्या निवांत दिवशी भरपूर जेवण केल्यावर किंवा जेवणामध्ये गोड पदार्थ जास्त खाल्ले गेल्याने तुम्ही पोटफुगी (Stomach Bloating) किंवा पोटदुखी (Stomach Pain) याचा अनुभव घेतला असेलच. अशाप्रकारे उद्भवणाऱ्या पोटफुगीमुळे शरीर जडजड वाटायला लागते आणि मनुष्य अगदी अस्वस्थ होऊन जातो. पोटाची ही तक्रार अतिशय सतावणारी किंवा त्रासदायी ठरते. यासाठी काही सोपे पोट फुगी उपाय आम्ही येथे सुचविले आहेत ज्यांचा अवलंब करून तुम्ही यातून नक्कीच सुटका करून घेऊ शकता.

पोटॅशियमयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा:
आपल्या आहारामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असलेले अन्नपदार्थ समाविष्ट करा. पोटॅशियममुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त ‘फ्लुइड्स’ किंवा द्रव बाहेर पडून पोटफुगी कमी होते. म्हणून आपल्या आहारामध्ये केळी, रताळी, पालक, पिस्ते अशा पदार्थांचा समावेश आवर्जून करायला हवा.

सकाळचा नाष्टा टाळू नका – फायबरयुक्त पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा:
बहुतेक लोक वेळेच्या अभावी किंवा आळस येतो म्हणून किंवा भूक लागत नाही म्हणून सकाळची न्याहारी करणे टाळतात आणि मग दुपारपर्यंत भूक अनावर झाल्याने दुपारच्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात अन्न सेवन करतात. रात्रीच्या जेवणातही पचण्यास जड पदार्थ सेवन केले जातात आणि परिणामी ’ब्लोटींग’ होते, म्हणजेच पोट फुगू लागते. सकाळच्या वेळी नाश्ता न करणे हे पोट फुगण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे सकाळी फायबरयुक्त पदार्थांचा आपल्या नाश्त्यामध्ये समावेश करावा. फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनाने पोट पुष्कळ वेळ भरलेले राहते, त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये आपोआपच अन्न सेवन मर्यादित राहते. एखाद्या मेजवानीला जाण्यापूर्वी देखील फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आपोआप भूक कमी लागेल आणि मेजवानीतील तेलकट, मसालेदार, पचण्यास जड पदार्थांवर ताव मारण्याचा मोह आवरता येणे शक्य होईल.

व्यायाम चुकवू नका – शारीरिक हालचाली करत राहा:
जेवण झाल्यानंतर अनेक जणांना सुस्ती येते, शैथिल्य येते. या सुस्तीपायी अनेकजण आपल्या दिनचर्येतून व्यायामाला पूर्णपणे फाटा देऊन टाकतात. असे न करता आपल्या दिवसातील काही वेळ व्यायामाकरिता देणे आवश्यक आहे. व्यायाम करणे अशक्य असेल, तर जास्त शारीरिक हालचाली होतील अशी कामे निवडा. ऑफिसमध्ये किंवा खरेदीला पायी जावे, शक्यतो लिफ्टचा वापर न करता जिन्यांवरून चढत जावे, बागकाम करावे, घराची सफाई करावी. या हालचालींमुळे शरीराला आवश्यक तो व्यायाम मिळून अन्नपचन सुरळीत होते आणि पोट फुगणे कमी होते.

दिवसभरात भरपूर पाणी प्या:
आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी पिणे देखील समाविष्ट करावे. पाणी पिताना एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळावे. पाणी पिताना थोडे थोडे पाणी दिवसातून अनेकदा प्यावे. आपल्या शरीराला सामान्यपणे ३ ते ४ लिटर पाण्याची रोज आवश्यकता असते म्हणजेच दररोज तुम्ही न चुकता १० ते १५ ग्लास पाणी हे प्यायलेच पाहीजे.

आहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रित करा:
आपल्या आहारातील मिठाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. मिठाच्या अतिसेवनाने शरीरामध्ये फ्लुईड्स साठत राहतात आणि परिणामी पोट फुगू लागते.

पुदिन्याचा काढा किंवा चहा प्या:
जर जास्त खाण्यामुळे गॅसेस (Stomach Pain Gas) किंवा अपचन (Indigestion) झाले तरी पोट फुगु लागते. अश्या वेळी पुदिन्याची पाने घालून केलेला काढा किंवा चहा पोटफुगी कमी करण्यास मदत करतो. परंतु या चहामध्ये साखर घालू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही