यामुळे निश्चित झाला हिटलरच्या मृत्यूचा कालावधी


विसाव्या शतकाच्या इतिहासामध्ये जर्मन तानाशाह हिटलरचा मृत्यू ही मोठी महत्वाची घटना समजली जाते. १९४५ साली, तीस एप्रिल रोजी, एका एअर रेड शेल्टरमध्ये हिटलरने आत्महत्या केली. त्याने जिथे आत्महत्या केली, ते त्याचे युद्ध्द्कालीन निवासस्थान असून, त्याला ‘फ्युरर्स बंकर’ म्हणजेच ‘नेत्याचा बंकर’ असे ही म्हटले जात असे. ही घटना घडून गेल्यानंतर, हिटलरचा मृत्यू झाला किंवा नाही ह्याबद्दल अनेकांनी शंका घेण्यास सुरुवात केली. अफवांचे पीक उठले. अनेकांच्या मते, हिटलरने आपल्या मृत्यूचे नाटक केले असून, जो मेला तो वास्तविक हिटलरचा तोतया होता, व खुद्द हिटलरने अन्यत्र पलायन केले असल्याचे म्हटले. त्यानंतर हिटलरने आपले उर्वरित आयुष्य दक्षिण अमेरिकतील एका लहानशा गावामध्ये व्यतीत केले असे सांगणारे अनेक लेख, पुस्तके, डॉक्यूमेंटरिज अस्तित्वात आल्या. मात्र जगावर राज्य करण्याची स्वप्ने पाहणारा हिटलर कुठल्यातरी गावामध्ये निनावी आयुष्य कंठतो आहे, हे कल्पनाच इतिहासकारांनी धुडकावून लावली.

ज्या ठिकाणी हिटलरने आत्महत्या केली असे म्हटले गेले, तिथे हिटलर आणि त्याची पत्नी एव्हा ब्राऊन यांच्या व त्यांच्या दोन पाळीव कुत्र्यांच्या शवांचे दहन करण्यात आले. मात्र हिटलरच्या मृत्युनंतर ही बातमी बाहेर फुटू नये ह्याची काळजी तत्कालीन सोव्हियेत सैन्याने घेतली. किंबहुना हिटलर जिवंत असून त्याने अन्यत्र पलायन केले असल्याची लोकांची समजूत व्हावी असा सोव्हियत नेता स्टालिन ह्यांचा मानस होता. पण तेव्हा तिथे जे शव सापडले, त्याच्या अवशेषांची दंतचिकित्सा केली गेल्यानंतर ते शव हिटलरचेच असल्याचे फ्रेंच शास्त्रद्यांचे म्हणणे आहे. ह्या फ्रेंच शास्त्रज्ञांना हिटलरच्या देहाच्या अवशेषांवर चाचणी करण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार चाचण्या केल्या गेल्यानंतर हे दात हिटलरचे असून, त्याचा मृत्यू १९४५ सालच्या सुमारासच झाल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

हिटलरच्या जबड्याची हाडे आणि इतर अवशेष रशियाच्या ताब्यात होते. ती जबड्याची हाडे आणि त्यावरील कवळी ह्यावरून हिटलरची ओळख पटल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वयाच्या ५६व्या वर्षापर्यंत हिटलरचे मूळचे केवळ पाचच दात शिल्लक असून, त्या व्यतिरिक्त कवळीचा वापर हिटलर करीत असे. ह्या दातांवर सापडलेल्या निळ्या पदार्थाची चाचणी करून हिटलरने सायनाईड नामक जालीम विषाचा उपयोग केला असावा, आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

१९४५ सालच्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस हिटलरचे सैन्य सोव्हियेत सैन्यापुढे कमकुवत पडू लागले. बाहेरून कोणत्याही प्रकारची मदत हिटलरला मिळणे अशक्य होते. त्याच्याजवळची रसद आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठाही आटत चालला होता. अखरीस २८ आणि २९ एप्रिल १९४५ रोजी हिटलरने आपल्या अनेक अधिकाऱ्यांना बंकर सोडून निघून जाण्यासाठी परवानगी दिली. काही जण गेले, तर काही जण हिटलरसोबत बंकरमधेच राहिले. हिटलरची प्रेयसी असलेल्या एव्हा ब्राऊनशी त्याने विवाह केला आणि स्वतःच्या मृत्यूची तयारी सुरु केली. आपल्या मृत्यनंतर आपले दहन केले जावे अशी इच्छा हिटलरने व्यक्त केली होती. त्यानंतर हिटलरने आपल्या सर्व स्वकीयांचा निरोप घेतला आणि तो आपल्या खोलीमध्ये आपल्या पत्नीसमवेत निघून गेला. सुमारे दोन तासांनंतर हिटलरच्या खोलीमधून गोळ्या झाडण्याचे आवाज कानी आले. हिटलरच्या सहायकाने खोलीचा दरवाजा फोडल्यानंतर त्यांना हिटलर, आणि त्याची पत्नी एव्हा ह्यांची शवे सापडली. त्यानंतर ‘राईष चान्सलरी’ तील उद्यानात ह्या शवांचे दहन करण्यात आले. त्यानंतर जर्मन सरकारच्या वतीने हिटलरच्या मृत्यूची घोषणा केली जाऊन, त्याने वीराप्रमाणे युद्धामध्ये स्वतःचे बलिदान केले असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले.

Leave a Comment