वृद्धत्व टाळणारी गोळी

म्हातारपण टाळणारी गोळी येणार येणार अशी चर्चा खूप होत आहे. पण ती गोळी नेमकी कधी येणार आणि कशी येणार, याबाबत ठोस असे काही सांगितले जात नाही. मात्र आता लंडन युुनिव्हर्सिटीतील जनुकशास्त्राचे संशोधक डेम लिंडा पॅट्रीज यांनी येत्या काही वर्षात अशी गोळी बाजारात येईल, असे खात्रीशीररित्या सांगितलेले आहे. ही गोळी म्हणजे नेमके काय, या संबंधात त्यांनी काही खुलासे केले आहेत. कारण अशा प्रकारची जादुई गोळी बाजारात येणार म्हटल्यानंतर अनेकांच्या उत्सुकता ताणल्या गेल्या आहेत आणि ही गोळी म्हणजे चिरतारुण्य प्राप्त करून देणारा रामबाण इलाज आहे, असा गैरसमज निर्माण झाला आहे. ही गोळी अमरत्व प्राप्त करून देणारी नाही, असे डॉ. पॅट्रीज यांनी आवर्जून सांगितलेले आहे. नेमकेपणाने सांगायचे झाले तर शरीरातले काही अवयव क्षीण होण्याची प्रक्रिया या गोळीने मंद होऊ शकते. त्याचबरोबर लोक वृद्ध झाले की, कर्करोग, अल्झायमर, मूत्रपिंडाचे विकार, हृदय विकार असे आजार त्यांना होण्याची शक्यता असते. त्यातले काही झाले नाही तरी लोक वृद्धावस्थेमध्ये अशक्त होतात, त्यांची पचन संस्था मंदावते आणि वृद्धापकाळाने अंथरुणाला बरीच वर्षे खिळून राहून हे वृद्ध लोक शेवटी मृत्युमुखी पडतात.

वृद्धापकाळ टाळणार्‍या गोळीने हा अंथरुणाला खिळून राहण्याचा त्रास कमी होईल, असे डॉ. पॅट्रीज यांनी नेमकेपणाने सांगितले. अशा प्रकारची गोळी उपलब्ध झाली की, लोकांचे आयुर्मान वाढेल. १९५० साली भारतीयांचे सरासरी आयुर्मान ३२ वर्षे होते. आता ते वाढून ५६ वर्षे झाले आहे. ते अजून वाढायला हवे. वाढूही शकतेे. अमेरिकेचे सरासरी आयुर्मान ८० वर्षे आहे. १९०० साली ते केवळ ४७ वर्षे होते. अमेरिकेतल्या लोकांचे आयुष्य आणखी वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. स्टेम सेल्स, एजिंग बायालॉजी, मॉल्युक्युलार बायो-डायनामिक्स, जेनेटिकल इंजिनियरिंग यांच्या साह्याने तसेच नवीन तंत्रज्ञाने आणि औषधे यांच्या वापराने माणसाचे जीवन अधिक सुसह्य, निरामय करण्याचे प्रयत्न होत आहेत. ते निरामय होणे म्हणजेच आयुर्मान वाढणे. अमेरिकेत नॅशनल इन्स्टिटयूट ऑन एजिंग या संस्थेने वृद्धत्वातल्या समस्यांवरच संशोधन सुरू केले आहे. या अवस्थेतले आरोग्याचे प्रश्‍न सुटावेत हा त्यांचा हेतू आहे. आयुर्मान वाढावे हा काही संशोधनाचा हेतू नाही पण या संशोधनाचा ङ्गायदा होऊन किंवा त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून आयुर्मान वाढणारच आहे. ते अमेरिकेत महिलांच्या बाबतीत १०० वर्षे आणि पुरुषांच्या बाबतीत ९० वर्षे होईल. अन्य विकसनशील देशांत ते महिलांच्या बाबतीत ९० वर्षे आणि पुरुषांच्या बाबतीत ८० वर्षे होईल.

आयुर्मानावर परिणाम करणारी आणखीही काही ठोस संशोधने पुढे यायला लागली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही वृद्धत्वाची चिन्हे टाळणारी गोळी शोधण्यात येत आहे. पण तेवढी एकच गोळी हे काम करील असे काही वाटत नाही. गोळी सोबत अन्यही काही उपचार करण्याची शिङ्गारस होईल. आयुर्मान वाढणे हा अनेक उपचारांचा परिणाम असेल. आयुष्य वाढणे हा काही चमत्कार नाही. सातत्याने केल्या जाणार्‍या संशोधनाचा तो परिपाक असतो. वृद्धत्व लांबणीवर टाकणारी गोळी हाही काही चमत्कार नाही. मात्र ती गोळी सांगताना, चमत्काराच्या भाषेत सांगितली जात असतेे. या गोळीचे घटक कोणते याचे तपशील ऐकल्यावर आपल्याला ती गोळी म्हणजे अनेक गुंतागुुंतीच्या संशोधनांचे ङ्गलित असल्याचे लक्षात येते. आयुर्मान वाढण्याचे तसे अजूनही काही प्रयत्न होत आहेत. त्या शोधांचे विश्‍लेषण केल्यावर त्यांनी आयुष्य वाढू शकेल अशी खात्री पटली पाहिजे. मुख्य प्रश्‍न असा आहे की, असे कृत्रिमरित्या आयुष्य वाढवण्यापेक्षा आणि वाढलेले आयुष्य कण्हत कुंथत जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा जेवढे मिळाले आहे तेवढे जीवन जगावे. वरचे बोलावणे आले की जगाचा निरोप घ्यावा. उगाच जादा जगून नव्याने जन्माला येणार्‍यांच्या जागा, नोकर्‍या अडवून बसू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment