ही आहे शिवशक्ती अक्षरेषा


भारतात फार प्राचीन काळापासून एक रहस्य आजही उलगडलेले नाही आणि ते आहे शिवशक्ती अक्षरेषेचे. काय आहे ही रेषा. आपण जाणतो कि पृथ्वीवर विविध स्थळे लोकेट करण्यासाठी काल्पनिक अक्षांश, रेखांश आखले गेले आहेत. पृथ्वीवरचे कोणतेही स्थान किती अक्षांश रेखांश वर आहे त्यावरून ती जागा निश्चित केली जाते. देवांचे देव महादेव किंवा शिवशंकर यांचे पहिले निवासस्थान कैलास तर दुसरे केदारनाथ मानले जाते. प्राचीन काळापासून न उलगडलेले हे रहस्य देशातील सात प्राचीन शिवमंदिराबाबत आहे. उत्तराखंड मधील केदारनाथ ते दक्षिण टोकाकडील रामेश्वरम या २.३८३ किमी अंतरात एकूण सात शिवमंदिरे असून ती एकाच अक्षांश आणि रेखांश रेषेवर आहेत.

ज्या काळी अक्षांश आणि रेखांश मोजण्याची सुविधा नव्हती त्याकाळात एकाच रेषेवर ही महाप्रचंड मंदिरे कशी उभारली गेली याचे रहस्य आजही कायम आहे. ही रेषा शिवशक्ती अक्षांश रेषा म्हणून ओळखली जाते. ७९ अंश इ, ४१’ आणि ५४’’ अशी ही रेषा आहे. यात समान अंतरावर ही सात शिवमंदिरे आहेत.

पहिले आहे केदारनाथ. उत्तराखंड मधील हे मंदिर अर्धज्योतिर्लिंग असून नेपाल मधील पशुपती आणि केदार हे पूर्ण ज्योतिर्लिंग बनते. आदिगुरु शंकराचार्य यांनी येथे साधना केली होती त्यांची समाधी येथे आहे असे मानले जाते.


तेलंगाना मधील करीमनगर जवळ असलेले कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिर हे यातील दुसरे मंदिर. याला कालेश्वरम असेही म्हणतात. येथील शिवलिंग स्वयंभू आहे. तेलंगणातील त्रिलिंगम पैकी हे एक आहे. गोदावरी काठी असलेल्या या मंदिरात एकाच ठिकाणी दोन शिवलिंगे असून त्यातील एक शिव तर दुसरे मृत्युदेव यम याचे आहे असे मानले जाते. या ठिकाणाला दक्षिण गंगोत्री असेही म्हणतात.


आंध्रप्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरापासून ३६ किमी वर असलेले श्रीकालहस्ती मंदिर हे यातील तिसरे मंदिर. येथे श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे नाग आणि हस्ती म्हणजे हत्ती यांनी शिव उपासना केली होती असे मानतात. स्वर्णामुखी नदीकाठी असलेले हे मंदिर दक्षिण कैलास म्हणून ओळखले जाते.


तमिळनाडूतील कांचीपुरम मधले एकाम्बरेश्वर मंदिर हे या मंदिर साखळीतील चौथे मंदिर असून येथे पार्वतीने वाळूचे शिवलिंग बनवून आम्रवृक्षाखाली तपस्या केली होती. येथे चमेलीच्या तेलाचा अभिषेक शिवलिंगाला केला जातो. पल्लव राजांनी बांधलेल्या या मंदिराचे पुनर्निमाण चोल आणि विजयनगरच्या राजांनी केले.


अन्नामाल्लेयर मंदिर हे या साखळीतील पाचवे मंदिर तमिळनाडू मध्ये अरुणाचल पर्वतावर आहे. त्याला अरुणाचलेश्वर असेही म्हणतात. येथे शिवलिंग अग्नीस्वरुपात प्रकट झाले होते असे सांगितले जाते. विष्णू आणि बह्म याच्यात श्रेष्ठत्वावरून झालेला वाद शिवाने संपविला होता ते हे ठिकाण असे सांगतात.


तीलईनटराज मंदिर हे या साखळीतील सहावे मंदिर तमिळनाडूतील चिदंबरम येथे आहे. या मंदिरांच्या भिंतींवर शिव नृत्य मुद्रा मूर्ती असून भरतनाट्यम कलाकारांसाठी हे विशेष स्थान आहे. येथे शिव ओंकारस्वरुपात आहेत असे मानले जाते.


या शिवअक्ष रेषेवरील शेवटचे आणि सातवे मंदिर आहे रामेश्वरम. तमिळनाडू मध्ये समुद्रकिनारी असलेले हे अतिप्राचीन आणि विशाल मंदिर रामायण कथेशी जोडलेले आहे. सीतेची लंकेतून सुटका करण्यासाठी वानर सेना सेतू बांधत होती तेव्हा रामाने वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा केली होती असे मानले जाते.

Leave a Comment