विविध देशात बाळांची ही नावे ठेवण्यावर आहे बंदी


जगाच्या पाठीवर कुठेही बाळ जन्माला आले कि त्याचे नामकरण म्हणजे बारसे केले जाते. भारतासारख्या देशात बाळाचे नाव काय ठेवावे यासाठी काही खास नियम नाहीत. त्यामुळे पालक मुलाचे नाव कोणतेही त्यांच्या पसंतीचे ठेऊ शकतात. नुकतेच लोकसभा निवडणुकीत भाजपने विजयाचे झेंडे फडकविले आणि पंतप्रधान मोदी यांचा उदो उदो सुरु झाला तेव्हा मुस्लीम परिवारात जन्माला आलेल्या एका बाळाचे नाव मोदी ठेवले गेल्याचे नुकतेच प्रसिद्ध झाले. जगातील अनेक देशात मात्र पालकांना बाळाचे हवे ते नाव ठेवण्याचे स्वातंत्र नाही. कोणते आहेत हे देश आणि कोणती नावे ठेवण्यावर तेथे बंदी आहे ही माहिती अगदी रोचक आहे.


फॅशन आणि आधुनिकता यात आघाडीवर असलेल्या फ्रांस देशात आयुष्यभर चेष्टा होऊ शकेल अशी नावे ठेवण्यावर बंदी असून ही बंदी न्यायालयाने घातलेली आहे. बंदी असलेल्या नावात नातेला, स्ट्रॉबेरी, डेमन, प्रिन्स विलियम्स, मिनी कुपर या नावांवर बंदी आहे तर जर्मनीत नवजात बालकाचे नाव ठेवण्याबाबतचे नियम कडक आहेत. येथे मट्टी, ओसामा बिन लादेन, हिटलर, कोएल, स्टॉंपी ही नावे ठेवता येत नाहीत. स्वित्झर्लंड मध्ये अगोदर परवानगी घेऊनच मुलाचे नाव ठेवले जाते. तेथे जुदास, चॅनल, पॅरीस, स्मिड, मर्सिडीज अशी नावे ठेवता येत नाहीत.

आईसलंड मध्ये बाळाचा जन्म झाल्यावर सहा महिन्याच्या आत त्याच्या नावाची नोंदणी करावी लागेते. तेव्हाही जी नावे अधिकृत यादीत समाविष्ट आहेत त्यापेक्षा वेगळे नाव ठेवायचे असेल तर आईसलंड नामकरण कमिटीची मंजुरी घ्यावी लागते. येथे झु, हॅरीयट, डंकन, एनरिक, लुडविग या नावांवर बंदी आहे. डेन्मार्क मध्ये सरकारने नावांची यादी तयार केली आहे त्यातून बाळाचे नाव निवडावे लागते. येथेही जॅकि, अॅसलाय, अन्स, मंकी, प्लुटो ही नावे ठेवता येत नाहीत. नॉर्वे मध्ये हॅन्सन, जोहान्सन, ओल्सन, हगेन, लार्सेन नावांवर बंदी आहे.


स्वीडन मध्ये बाळाचे पहिले नाव बंदी असलेल्या नावावरून ठेवता येत नाही. दुसऱ्यांना अथवा नावाचा वापर करणाऱ्याला त्रास होईल असे नाव येथे ठेवता येत नाही. त्यात मेटालिक, सुपरमन, आईका, एल्व्हिस या नावांचा समावेश आहे. मलेशिया मध्ये प्राणी, आकडे अथवा शाही आणि मानद व्यक्ती, खाण्याचे पदार्थ किंवा अपमान होईल अशी नावे ठेवता येत नाहीत. त्यात साप, संभोग, कुबड, पागल या अर्थाची नावे ठेवता येत नाहीत. सौदी मध्ये मलिका, मलक, लिंडा, माया अशी विदेशी अथवा पैगंबर शी संबंधित नावे ठेवता येत नाहीत. पोर्तुगालने तर जी नावे नियमबाह्य आहेत अशी ८२ पानी यादी तयार केली असून त्यात रिहाना, निर्वाण, जिमी, विकिंग, सायोनारा या नावांचा समावेश आहे. न्यूझीलंड मध्ये १०० कॅरेक्टर पेक्षा अधिक मोठी नावे ठेवता येत नाहीत.

Leave a Comment