या रुग्णालयात कुंडली पाहून केले जातात उपचार


विज्ञान आणि ज्योतिष ही दोन वेगळी क्षेत्रे आहेत. डॉक्टर लोकांचा ज्योतिष वगैरे प्रकारांवर फारसा विश्वास नसतो आणि ज्यांचा असतो ते ज्योतिष पाहून रुग्णावर उपचार करत नाहीत किंवा त्यांच्या रुग्णपरीक्षेत ज्योतिषाचा व्यत्यय येऊ देत नाहीत. मात्र राजस्थानची राजधानी जयपूर शहरात नुकतेच एक रुगणालय सुरु झाले आहे आणि येथे रुग्णाला दाखल केल्यावर प्रथम त्याची कुंडली तपासली जाते आणि त्यानुसार त्याच्यावर करावयाच्या उपचाराची दिशा ठरविली जाते. या रुग्णालयाचे नाव युनिक संगीता मेमोरियल हॉस्पिटल असे असून त्याचे उद्घाटन फेब्रुवारी २०१९ मध्ये कॉंग्रेस सरकारने केले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या हस्ते झाले आहे.

या रुग्णालयात प्रवेश केल्यावर औषध कौंटर जवळच ज्योतिष कौंटर आहे. येथे उपचार अत्याधुनिक अॅलोपथी पद्धतीने केले जातात मात्र त्यापूर्वी आजाराचे निदान करण्यासाठी ज्योतिषाकडून रुग्णाची पत्रिका पहिली जाते. रुग्ण प्रथम ज्योतिष कौंटर वर जातो तेथे त्याची कुंडली बनवून तपासली जाते आणि कोणती व्याधी असावी याचा अंदाज घेतला जातो. मग त्या दिशेने उपचार केले जातात. रुग्ण या पद्धतीवर समाधानी आहेत असे सांगितले जाते.

येथील प्रमुख डॉक्टर महेश कुलकर्णी सांगतात, ज्योतिष येथे केवळ आजाराचे निदान करण्यासाठी नाही तर रुगांच्या कौन्सिलिंग मध्येही उपयोगी ठरते आहे. रुगांच्या वैद्यकीय तपासण्या आणि ज्योतिषाचे कुंडली पाहून केलेले निदान हे अनेकदा सारखेच आहे असे दिसून आले आहे. भारतीय संस्कृतीत ज्योतिषाला विज्ञान मानले गेले आहे आणि ज्योतिष व आधुनिक वैद्यकीय विज्ञान यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. येथे अखिलेश शर्मा नावाचे ज्योतिषी नियुक्त केले असून ते दररोज २५ ते ३० रुग्णांच्या पत्रिका पाहून व्याधी कोणती असावी याचा अंदाज व्यक्त करतात. पुन्हा वैद्यकीय चाचण्या केल्या जातात त्यात बरेचदा दोन्ही रिपोर्ट सारखे असल्याचे दिसून आल्याचे डॉक्टर सांगतात.

Leave a Comment