पाण्याचे नियोजन अवश्य केले पाहिजे

water-management
कित्येक गावांमध्ये नद्यांचे काही डोह होते. आपले आजोबा किंवा पणजोबा आपल्याला सांगत आले आहेत की, आपल्या गावच्या नदीचा डोह कधीच आटलेला नव्हता. कारण त्या डोहातले पाणी संपेपर्यंत ते खेचून उपसून काढण्याची इलेक्ट्रिक मोटार सारखी यंत्रे आपल्याकडे नव्हती. त्यामुळे डोह कधी आटत नव्हता. आता मात्र आपण भारी भारी मोटारी तयार केल्या. पाच हॉर्स पॉवरच्या मोटारींची क्षमता कमी वाटू लागली म्हणून दहा किंवा वीस हॉर्स पॉवरच्या मोटारी लावून पाणी खेचले. त्यामुळे डोह सुद्धा आटायला लागले. आपण ज्या प्रमाणात पाणी खेचले त्या प्रमाणात आपण जिरवले नाही. त्यामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी वरचेवर खोल जात गेली. पूर्वजांनी हेतुपुरस्सरपणे जिरवलेले किंवा त्यांच्याकडे पाणी उपसण्याची यंत्रे नसल्यामुळे जमिनीत बराच काळ मुरलेले पाणी खोल खोल गेले. आता पाणी लागायचे म्हटल्यानंतर दीडशे ते दोनशे ङ्गूट खोल बोअर मारावे लागते. काही काही ठिकाणी तर त्यापेक्षाही खोल जावे लागते. खोलावर जाऊन पाणी शोधणारी यंत्रे सुद्धा आपण शोधलेली आहेत आणि आपण खोलातले पाणी सुद्धा संपवायला लागलो आहोत. त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे, पाणी अडवा, पाणी जिरवा.

पाण्याची जमिनीच्या अंतर्गत असलेली पातळी किती खोलवर गेली आहे आणि त्यामुळे अधुन मधुन येणारे दुष्काळ पाण्याच्या बाबतीत किती असह्य झाले आहेत याचा अनुभव आपण घेतच आहोत. पण ही पाण्याची पातळी वर आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे. ते शेतकर्‍यांनाच करावे लागणार आहे कारण ती त्याचीच गरज आहेआणि त्यानेच ते मोठ्या प्रमाणावर खेचलेले आहे. पाण्याच्या टंचाईबाबत सर्वांचा रोख शेतकर्‍यांंकडे असतो आणि पाणी बचत करायचे असेल तर ते शेतकर्‍यांनीच केले पाहिजे अशी समाजाची अपेक्षा असते. आपल्या देशात उपलब्ध असलेल्या पाण्याचा मोठा हिस्सा शेतकरीच वापरत असतात. ९० टक्के पाणी शेतीला लागते आणि त्यांनी त्यात थोडीशीही बचत केली तरी पाणी बर्‍याच अंशी शिल्लक राहणार आहे. तशी तर पाणी सर्वांनीच बचत केले पाहिजे पण ते बचत करण्याची संधी शहरांतल्यापेक्षा शेतात जास्त असते.शेतकर्‍यांनी ते केलेही पाहिजे. त्यासाठी एक साधा उपाय योजावा लागणार आहे. तो ङ्गार अवघडही नाही.

शेतातले पाणी शेतात आणि शिवारातले पाणी शिवारातच जिरवणे. त्यातला एकही थेंब वाहून गावाच्या बाहेर जाता कामा नये. पडलेला पाऊस सगळा आपल्या शेतात जिरवला की जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढायला लागतेच पण जमिनीत पाणी मुरवण्याने उन्हाळ्याचा तडाखा कमी होतो. कारण, उन्हाने जमीन म्हणजे माती लवकर गरम होते आणि ती गरम झाली की हवेत गरमी वाढायला लागते. ती उशिरा पर्यंत गरम राहते. पाण्याचे तसे नसते. पाणी उन्हाने लवकर गरम होत नाही आणि गरम झाले तरी लवकर थंड होते. आपण जमिनीत भरपूर पाणी जिरवले की ते पाणी म्हणजे जमिनीत मुरवलेले पाणी उन्हाने लवकर गरम होत नाही आणि ते हवा थंड ठेवायला मदत करते.

सध्या सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंगचा गवगवा सुरू आहे. त्याची अनेक कारणे सांगितली जात असतात. विजेचा वाढता वापर, हवेत वाहनातून सोडला जाणारा कर्ब वायू आणि कारखान्यांतून सोडले जाणारे अनेक प्रकारचे धूर तसेच ग्रीन हाऊस यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहेच पण जमिनीत पाणी मुरलेले नसणे हेही एक ग्लोबल वॉर्मिंगचे कारण आहे. जमिनीत पाणी असले की जमीन लवकर तापत नाही. पण जमिनीत पाणी नसेल तर ती जमीन लवकर तापते. तेव्हा जमिनीत पाणी मुरलेले असणे हे शेतातल्या हवामानावरही परिणाम करणारे ठरत असते. या हवामानाचे परिणाम शेतातल्या पिकांवरही होत असतात. तेव्हा आणि जिरवण्याकडे केवळ पाण्याची उपलब्धता वाढावी याचसाठी न पाहता इतरही अनेक निमित्ताने पाहता येत असते. पिकाच्या दर एकरी उत्पादनावरही पाणी जिरवण्याचा परिणाम होेत असतो.

नुकताच महाराष्ट्रात शासनातर्ङ्गे शेततळी निर्माण करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमात सर्वांनाच तळी मंजूर होणार नाहीत. ज्यांना मंजूर होत नाहीत त्यांनी निराश न होता आपल्या स्वत:च्या जोरावर तळे निर्माण करावे. त्यामुळे आपला खर्च करावा लागेल पण सरकारी मंजुरीतून निर्माण होणार्‍या तळ्यांत आपल्याला सरकारच्या नियमानेच काम करावे लागते या उलट आपण आपले तळे खोदले असेल तर त्याचे स्वरूप आणि वापर यावर सरकारचे नियंत्रण नसेल. तेव्हा सरकारची वाट न पाहता आपले स्वत:चेही तळे निर्माण करता येते. पाण्याच्या बचतीसाठी ङ्गार काही कष्ट न करता बचतीचे दोन मार्ग अवलंबण्यात काही अडचण येणार नाही असे वाटते. पहिला उपाय ज्यांना पाटाचे पाणी मिळते त्यांच्यासाठी आहे. त्यांना पाटाचे पाणी बेशिस्तपणे आणि अनियमिपणे मिळत असते कारण त्याचे वाटप काही ठराविक लोकांच्या हातात असते. ते सुधारण्यासाठी अशा शेतकर्‍यांनी पाणी वाटप सहकारी संस्था स्थापन करावी. राज्याच्या काही भागात अशा संस्था स्थापन झाल्या आहेत आणि त्यांंना शिस्तीत पाणी मिळायला लागले आहे. कारण या पद्धतीत सरकारचा म्हणजे पाटबंधारे खात्याचा आणि सोसायटीचा करार झालेला असतो. या करारानुसार खाते या सोसायटीला नेमून दिलेले पाणी नेमून दिलेल्या वेळात देण्यास बांधलेले असते. एकदा सोसायटीला पाणी मिळाले की, ते पाणी सदस्यांना वेेळेत मिळते आणि ते ठराविक वेळेत मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांना पिकांचे वेळापत्रक आखून नियोजन करता येते. या पद्धतीत पाणी पट्टी वसूल करण्याची जबाबदारी सोसायटीकडे असल्याने ती चांगली वसूलही होते.

सोसायटीमुळे अनेक शेतकरी चांगली नियोजन बद्ध शेती करायला लागले आहेत. त्याना कमी पाण्यात चांगले पीक घेणे शक्य व्हायला लागले आहे. पाण्याचीही बचत होत आहे. वारेमाप आणि बेशिस्त पाणी सोडण्याचे प्रमाण कमी होत आहे. सरकार अशा सोसायट्यांना प्रोत्साहन देत आहे. पाण्याची बचत कोणी आधी करावी यावर वाद घालत बसण्यापेक्षा सोसायटी स्थापन करायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट आपण करू शकतो ती आपल्या अखत्यारीत येते. आपण आपल्या शेतात काही पिके घेताना त्यांना पाणी किती लागते याचा हिशेब ठेवला पाहिजे. कोणत्या पिकाला जास्त पाणी लागते आणि कोणत्या पिकाला कमी पाणी लागते याची नोंद ठेवली पाहिजे. पिकाचे नियोजन करताना कोणते पीक जादा पाणी पिऊन कमी उत्पन्न देते आणि कोणते पीक कमी पाणी पिऊन जादा उत्पन्न देते याचा एकदा चाखाचोळा घेतला पाहिजे. उसासारखे पीक भरमसाठ पाणी पिते पण पैसे कमी देते. आता उसाला दोन हजार रुपये भाव आला तरीही एकरी सरासरी चाळीस ते पन्नास टनाचे एक लाख रुपये होतात पण आता उसापेक्षा कमी गुंतवणुकीत आणि कमी पाण्यात, तसेच कमी काळात काही पिके एक लाख रुपये मिळवून द्यायला लागली आहेत. तेव्हा अशा स्िथतीत आपण उसाला ङ्गाटा देऊन कमी पाण्यातली पिके घ्यायला हवीत. आपण एवढे तरी नक्कीच करू शकतो.

Leave a Comment