केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा; या वर्षाच्या अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यासाठी सक्षम


नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर 2021 पर्यंत किमान सर्व प्रौढांचे लसीकरण करण्यासाठी भारत सक्षम असल्याचा दावा केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा दावा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.

यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, भारताला ऑगस्ट आणि डिसेंबर 2021 च्या दरम्यान 216 कोटी कोरोना डोस उपलब्ध होणार आहेत, तर जुलैपर्यंत 51 कोटी डोस उपलब्ध होणार असल्यामुळे येत्या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान सर्व प्रौढ भारतीयांचे आपण लसीकरण पूर्ण करु शकतो.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल आणि त्यामध्ये बालकांना असलेल्या धोक्यांवरही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्या आरोग्य सुविधा अपग्रेड केल्या जात असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली.

कोरोना लसीकरणामध्ये गती आणण्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत भर दिला. तसेच केंद्र सरकारच्या वतीने 70 टक्के डोस हे दुसऱ्या डोससाठी उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील कोरोनाच्या लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार लस निर्मिती कंपन्यांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगत त्यांनी येत्या काही महिन्यात देशातील कोरोनाच्या लसीकरणाला गती मिळेल, असाही विश्वास व्यक्त केला.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लहान राज्यांतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करत कोरोनाविरोधात लढण्यासाठी टेस्ट, ट्रॅकिंग, ट्रेसिंग, उपचार आणि लसीकरण यासोबतच कोविड अॅप्रोप्रिएट बिहेव्हियरवर भर दिला.