जबरदस्त फीचर्स आणि शानदार लूकसह बाजारात दाखल झाली नवी स्विफ्ट टर्बो


सिंगापूर : सिंगापूरच्या बाजारपेठेत सुझुकीने नवीन स्विफ्ट स्पोर्ट हॅचबॅक कार लाँच केली असून 109,900 SGD (जवळपास 60 लाख रुपये) एवढी या अपडेटेड हॅचबॅकची किंमत ठेवण्यात आली आहे. नवीन स्विफ्ट स्पोर्टच्या लाँचिंगसाठी Motul ने सुझुकीबरोबर भागीदारीदेखील केली आहे, ज्यामध्ये मर्यादित संख्येने मालक एका वर्षासाठी विनामूल्य लुब्रिकेंट अपग्रेड जिंकतील. सिंगापूर-स्पेक मॉडेलमध्ये 1.4-लीटर, टर्बोचार्ज्ड, इन-लाइन फोर सिलेंडर इंजिन आहे जे 129ps पॉवर आणि 235 एनएम पीक टॉर्क देते.

या कारचे इंजिन 48V माइल्ड-हायब्रिड प्रणालीसह एकत्रितपणे कार्य करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल युनिट समाविष्ट आहे. हे पॉवरट्रेन युरो 6 डी एमिशन नॉर्म्सनुसार आहे. या हॅचबॅक कारच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्विफ्ट स्पोर्ट अवघ्या 9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास एवढा वेग पकडू शकते. जास्तीत जास्त 210 किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने ही कार धावते. त्याच वेळी ही कार प्रतिलिटर सरासरी 21.2 किमी एवढे मायलेज देते.

या कारच्या आतील भागात एक 7.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, जी Android ऑटो आणि Apple कार प्ले इंटीग्रेशनसह येते. 4.2 इंचाचा मल्टी-इन्फो डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट पॅनेलमध्ये देण्यात आला आहे. त्याच वेळी, आपल्याला यात इतर अनेक फीचर्सदेखील मिळतात ज्यात कीलेस एंट्री, एलईडी हेडलॅम्प्स / डीआरएल, हॅलोजन कॅमेरा, पुशबटन स्टार्ट स्टॉप, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि रिअर पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे.

या कारमध्ये 17 इंचांचा मशीन कट अ‍ॅलोय आपल्याला मिळेल. ज्यामुळे या कारला शानदार लुक मिळतो. या कारच्या एक्सटीरियर पेंट थीममध्ये इंटेल सिंगल टोन पर्याय आहे, जो ड्युअल टोन कलर थीमसह येतो. दरम्यान भारतात ही कार कधी लाँच केली जाईल, याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास, अशी माहिती मिळाली आहे की, भारतात ही कार लाँच होण्यास बराच वेळ लागू शकतो. यापूर्वी ही कार ऑटो एक्सपो 2020 मध्ये इतर मारुती कार्ससोबत सादर करण्यात आली होती.