ऑगस्टपासून भारतात होऊ शकते ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, पण हे संकट थांबविण्यासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्याची देशात सुरुवात करण्यात आली आहे. पण मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा होत असल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबविण्याची नामुष्की ओढावली आहे. सध्या भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व्यतिरिक्त स्पुटनिक-व्ही या लसी दिल्या जात आहे. रशियातील भारताचे राजदूत डी.बाला व्यंकटेश वर्मा यांनी यासंदर्भात माहिती देताना ‘स्पुटनिक व्ही’ लसीची निर्मिती ऑगस्ट महिन्यापासून भारतातच होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

डी.बाला व्यंकटेश वर्मा याविषयी माहिती देताना म्हणाले की, मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे एकूण ३० लाख डोस आयात होणार आहेत. तर जूनपर्यंत ५० लाख डोस आयात केले जातील, असा दावा करत त्यांनी या लसीची निर्मिती ऑगस्ट महिन्यापासून भारतातच होण्याची शक्यता वर्तविली आहे.

भारतामध्ये स्पुटनिक व्ही लस आणण्यासाठी डॉ. रेड्डीजने ‘रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड’ यांच्यासोबत करार केला आहे. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसींचा वापर केला जात आहे. आता या दोन लसींसोबत आणखी एका लसीला मान्यता मिळाल्यास लसीकरणाच्या मोहीमेला वेग येणार आहे. भारतात ८५ कोटींहून अधिक स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्याची योजना आहे. सध्या देशात दोन टप्प्यात एकूण २ लाख १० हजार लसीचे डोस रशियातून आले आहेत. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या वापराला १२ एप्रिल रोजी भारताने मंजुरी दिली होती.