मोदी सरकारचे सोशल मीडिया कंपन्यांना भारताचा उल्लेख असलेला ‘तो’ मजकूर हटवण्याचे आदेश


नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ‘इंडियन व्हेरिएंट’ची प्रचंड चर्चा सुरु आहे. आता केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया कंपन्यांना महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार कोरोनाच्या B.1.617 या व्हेरिएंटचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट असा करू नये, अशा सक्त सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

तसेच संबंधित व्यासपीठावरून अशाप्रकारचा उल्लेख असलेला मजकूर तात्काळ हटवण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने 11 मे रोजी कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काही वृत्तसंस्थांनी याचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट, असा करायला सुरुवात केली होती. पण, हा दावा सपशेल पोकळ आहे.

आपल्या निवेदनात जागतिक आरोग्य संघटनेने B.1.617 व्हेरिएंटचा कुठेही भारताशी संबंध जोडलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पण, चुकीच्या माहितीमुळे भारताच्या प्रतिमेला तडा जात असल्यामुळे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना इंडियन व्हेरियन्टबाबतचा मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.