कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व : सतेज पाटील


कोल्हापूर : ज्या मुलांचे पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत, अशा मुलांचे पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार आहे. याबाबतची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. आई किंवा वडील यापैकी एकजण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले असतील किंवा दोन्ही पालक मृत्युमुखी पडले असतील, अशा मुलांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. अशा मुलांची यादी बनवण्याचे काम पुढच्या चार दिवसात केले जाणार असल्याची माहिती देखील सतेज पाटील यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 45 मुले अशी आहेत ज्यांचे एक पालक कोरोना संकटकाळात मृत्युमुखी पडले आहेत, तर एक ते दोन मुले अशी आहेत, ज्यांचे दोन्ही पालक मृत्युमुखी पडले आहेत. या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सदैव त्यांच्या पाठिशी असणार आहे. शिवाय अशा मुलांचे पालकत्व देखील जिल्हा प्रशासन स्वीकारणार आहेत.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याला कारणीभूत असलेल्या रुग्णालयांवर आता कारवाई केली जाणार असल्याचे संकेत सतेज पाटील यांनी दिले आहेत. खासकरुन ग्रामीण भागांमध्ये स्थानिक डॉक्टर रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार करतात आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयांकडे पाठवले जाते. खाजगी रुग्णालय रुग्ण गंभीर झाल्यावर देखील अशा रुग्णांना सीपीआर रुग्णालयांमध्ये पाठवतात. ही बाब अतिशय गंभीर असून या रुग्णालयांची चौकशी केली जाणार आहे. आपल्या रुग्णालयात किती दिवस उपचार सुरु होते? त्या ठिकाणाहून रुग्णाला का हलवण्यात आले? रुग्णाची परिस्थिती कशी होती, याची माहिती घेण्याचे काम सुरु झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.