पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जर अपघात होत असेल तर ड्रायव्हर दोषी नाही


मुंबई: दादरच्या मॅजिस्ट्रेट न्यायालयाने रस्ते अपघातप्रकरणी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जर पादचाऱ्याच्या चुकीमुळे अपघात झाला, तर वाहनचालकाला दोषी धरता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हा निर्णय मॅजिस्ट्रेट न्यायालयाचे न्यायाधीश पी. देशमाने यांनी दिला आहे.

रस्त्यावरून चालताना किंवा रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगणे हे पादचाऱ्याचे कर्तव्य आहे. जर पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अपघात होत असेल तर त्या अपघातासाठी ड्रायव्हरला दोषी धरता येणार नसल्याचे न्यायाधीश देशमाने यांनी स्पष्ट केले. तसेच 5 वर्षापूर्वी झालेल्या अपघात प्रकरणातून एका 65 वर्षी महिलेला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

हे प्रकरण 20 ऑक्टोबर 2015 रोजीचे असून एक महिला 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता पायी ऑफिसला जात होती. ही महिला दादरच्या पारसी अग्यारी पर्यंत आली असेल, तेव्हा एका कारने तिला धडक दिल्यामुळे ही महिला जमिनीवर कोसळली असता तिच्या पायाच्या अंगठ्यावरून कारचे चाक गेले. ही कार एक उद्योजिका चालवत होती. दुर्घटना झाल्यानंतर या महिलेने कार थांबवलीही होती.

जखमी महिलेच्या पतीने दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर काही आठवड्यानंतर या महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आणि खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय दिला.

पायी चालणाऱ्यांसाठी फुटपाथ बनविण्यात आले आहेत. तसेच वाहनांसाठी रस्ते बनविण्यात आले आहेत. पण, ही जखमी महिला रस्त्यावरून जात असल्यामुळे गाडी चालवणाऱ्या महिलेला दोषी धरता येणार नसल्याचे निकालात न्यायालयाने म्हटले आहे.