एअर इंडियाच्या पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीमवर हॅकर्सचा डल्ला


नवी दिल्ली : हवाई वाहतुक कंपनी एअर इंडियाच्या पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीमवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार काही लोकांची माहिती कंपनीची डेटा प्रोसेसर कंपनी सीता पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीमकडून लीक झाल्यामुळे याचा थेट परिणाम जगभरातील 45 लाख प्रवाशांच्या डेटा सुरक्षिततेवर होत आहेत. दरम्यान, सायबर हल्ला झाल्याची माहिती मिळतात एअर इंडियाकडून प्रवाशांनी आपल्या क्रेडिट कार्डचे पासवर्ड बदलावे, असे आवाहन केले आहे. कारण लीक झालेल्या माहितीमध्ये क्रेडिट कार्डची माहिती, नाव, जन्मतारीख असा तपशील चोरी झाल्याचे कळत आहे.

26 ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 दरम्यान नोंदणी असणाऱ्या एअर इंडियाच्या पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीमवर जगभरातील 45 लाख प्रवाशांच्या डेटावर डल्ला मारण्यात आला आहे. याबाबतची पहिली सुचना 25 फेब्रुवारी 2021 ला पहिल्यांदाच समोर आली होती.
प्रवाशांची खासगी माहिती ज्यामध्ये त्यांचे नाव, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, पत्ता, पासपोर्ट क्रमांक, तिकीटाची माहिती, स्टार अलायंस आणि एअर इंडियाच्या फ्रिक्वेंट फ्लायर्सचा डेटा आणि क्रेडिट कार्डसंदर्भातील माहिती चोरीला गेली आहे. सदर प्रकरणाची माहिती समोर येताच सारवासारव करत एअर इंडियाने प्रवाशांच्या क्रेडिट कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक लीक झाला नसल्याचे म्हटले आहे. तर, सातत्याने प्रवास करणाऱ्यांचा पासवर्ड डेटाही सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.