पुणेकर इंजिनियरला एलन मस्क यांनी दिला “हा” रिप्लाय


नुकताच पुण्यातील एका मराठमोळ्या इंजिनियरला ट्विटरवरुन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक तसेच इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीच्या टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या एलन मस्क यांनी रिप्लाय दिला आहे. पुण्यातील प्रणय पाटोळे या इंजिनियरला एलन यांनी रिप्लाय दिला आहे. एलन यांना टॅग करुन प्रणयने काही ट्विट केले होते. या ट्विट्समध्ये प्रणयने ऑनलाइन पैशांच्या व्यवहारांसाठी मोठ्या आकाराच्या यंत्रणा उभारण्याची गरज नसल्याचे एलन यांना त्यांच्या तरुण्यामध्येच लक्षात आल्याचे म्हटले होते.

ज्यापद्धतीने आपण पैसा सध्या ऑनलाइन माध्यमातून पाठवतो, तो बदल घडवून आणण्यामागे एलन यांचा मोठा हातभार असल्याचे प्रणयने म्हटले आहे. तसेच क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलनासंदर्भातील तज्ज्ञांना प्रणयने प्रश्न विचारला आहे. एलन यांच्यावर विखारी आणि द्वेष पसरवणारी टीका करणाऱ्या अब्जाधीशांनी स्वत: काय मिळवले आहे, हे क्रिप्टोकरन्सी तज्ज्ञांनी विचारले पाहिजे, असे प्रणयने म्हटलं आहे.


या ट्विटमध्ये प्रणयने एलन यांच्या सुरुवातीच्या काळात बँक ऑफ नेवा सोटियामध्ये केलेल्या समर इनटर्नशीपसंदर्भात भाष्य केले आहे. सध्या टेस्ला आणि स्पेस एक्सच्या सीईओपदी असणाऱ्या एलन यांना या ठिकाणी काम करताना तासाचे १४ अमेरिकन डॉलर दिले जायचे. फक्त आपल्या डोक्यातील भन्नाट कल्पना त्यांच्या बॉसेससमोर मांडण्याचे एलन यांना काम देण्यात आलेले. या ज्ञानामुळेच एलनने कंपनी स्थापन करण्यासंदर्भातील आपला पाया मजबूत केला. त्याचबरोबर पैसा कसा काम करतो, हे आपल्या सर्वांपेक्षा एलन यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक असल्याचंही प्रणयने म्हटलं आहे.

एलन यांनीही प्रणयने केलेल्या या ट्विटला रिप्लाय दिला आहे. या रिप्लायमध्ये एलन यांनी त्याच्या इनटर्नशीपमुळे आपल्याला कसा फायदा झाला, यासंदर्भात त्यांनी केलेल्या भाष्याबद्दलच्या वृत्तांकनाची लिंक शेअर केली आहे. या ट्विटमध्ये एलन यांनी मला पीटर निकोल्सन यांच्यासोबत काम करताना आनंद मिळाल्याचे म्हटले आहे. त्यावेळी बँक ऑफ नेवा सोटीयामध्ये पीटर हे वरिष्ठ अधिकारी होते.


पण त्याचवेळी एलन यांनी आपण बँकेला चांगल्या संकल्पना दिल्या, तरी त्यांनी मला देण्यात येणाऱ्या मानधानामध्ये वाढ केली नसल्याची खंतही बोलून दाखवली. पीटर निकोल्सन यांच्यासोबत मी काम केले, असून ते भन्नाट होते. आम्ही एकमेकांना गणिताची कोडी घालायचो. बँकेला भरपूर नफा होणाऱ्या कल्पना मी दिल्या, पण त्यांनी मला किमान तासाचा एक डॉलर तरी वाढवून द्यायला हवा होता, असे एलन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रणयने हे ट्विटस सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये क्रिप्टोकरन्सीसंदर्भात बराच गोंधळ सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर केले होते. एलन यांच्यावर क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूकदारांनी टीका केली आहे. एलन मस्क यांनी बीटकॉइन्ससंदर्भात केलेल्या नकारात्मक वक्तव्यामुळे जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे टीकाकारांचं म्हणणे होते.

टेस्लाने वातावरण बदलासंदर्भातील कारण देत बीटकॉइन्समध्ये व्यवहार करणे बंद केले. कंपनीकडे असणाऱ्या बीटकॉइन्सपैकी काही किंवा सर्व बिटकॉन्सची विक्री केली जाणार असल्याचेही एलन यांनी एका ट्विटरवरील संवादामध्ये म्हटले होते. पण त्यावरुन गोंधळ निर्माण होऊन बीटकॉइन्सचे भाव पडल्यानंतर एलन यांनी ट्विट करुन कंपनीने अद्याप एकही बीटकॉइन विकला नसल्याचे स्पष्ट केले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि बीटकॉइन्सचे दर मोठ्याप्रमाणात कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते.