प्रतीकिलोला ९ कोटी रुपये किंमतीच्या चहाबद्दल कधी ऐकलेय?

२१ मे हा जागतिक चहा दिवस म्हणून साजरा होतो. चहा मध्ये अनेक प्रकार आहेत. जागतिक चहा दिनानिमित्ताने चहाच्या महागड्या प्रकारांची चर्चा नेहमीच केली जाते. सर्वाधिक महागडा चहा म्हणून आसामच्या मनोहारी बागेतील गोल्डन लीफ टी जगप्रसिध असून त्याचा दरवर्षी लिलाव केला जातो. या चहाची किंमत किलोला ५० हजार रुपये आहे. मात्र जगातील सर्वात महाग चहा पत्ती भारतात नाही तर चीन मध्ये मिळते.

दाहोंग पा ओ टी नावाचा हा चहा चीनच्या फुजीयान प्रांतात वुईसन पहाडी भागात होतो. या चहाची किंमत आहे किलोला ९ कोटी रुपये. या चहाची लागवड चहा बागा मध्ये होत नाही आणि त्याचे उत्पादन सुद्धा खुपच कमी होते. सर्व व्याधी दूर करणारा म्हणून या चहाची ख्याती असून या १० ग्राम चहासाठी १० ते २० लाख रुपये मोजण्याची अनेकांची तयारी असते. चहाचे हे झुडूप खास प्रकारचे असते.

या चहाला जीवनदायीनी असेही म्हणतात. मिंग शासन काळात मिंग राजाची आई, महाराणी अचानक आजारी झाली आणि कोणत्याच औषधाने तिला गुण येईना. अखेर वैद्यांनी तिला हा चहा पिण्याचा सल्ला दिला आणि महाराणी आजारातून पूर्ण बरी झाली. तेव्हा मिंग राजाने या चहाची झाडे लावण्याचे आदेश दिले असे सांगतात. हा मिंग राजा नेहमी लाल रंगाचा लांब डगला घालत असे त्यावरून या चहाला दहोंग पा ओ असे नाव पाडले. याचा अर्थ आहे मोठा लाल डगला.

हा चहा बनविण्याची खास पद्धत असून त्यात दहा पायऱ्या आहेत. शुद्ध पाणी उकळून उकळी आल्यावर त्यात लगेच ही पत्ती टाकली जाते आणि नंतर ठराविक काळ मुरवून मग चहा प्यायला जातो. वर्षातून एकदाच या झाडाची पाने तोडली जातात आणि तो काळ असतो मे जूनचा महिना. अगोदर उन्हात ही पाने वाळविली जातात नंतर सावलीत सुकविली जातात. याचा रंग हिरवट तपकिरी असतो.