नवाझ शरीफ यांच्या शेतजमिनीचा लिलाव, रक्कम सरकारी खजिन्यात जमा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान पंजाब प्रांतातील ११ एकराहून अधिक जमिनीचा न्यायालयाच्या आदेशाने लिलाव करण्यात आला. या जमिनीचे बेस प्राईस  ७० लाख रुपये प्रती एकर अशी ठरविली गेली होती. लिलावात ही जमीन ११. २ कोटींचा विकली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार शरीफ यांच्यावर तोषोखाना केस मध्ये सामील असल्याचा आरोप आहे. ते कोर्ट सुनावणीत सामील झाले नव्हते आणि आजारी असल्याचे कारण देऊन उपचारासाठी ब्रिटनला गेले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२० मध्ये शरीफ याना फरारी घोषित केले आहे आणि त्यांच्या सर्व संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. शरीफ यांच्या मालकीचे सर्व शेअर्स विकले जाणार असून संपत्ती विक्रीतून मिळणारे सर्व पैसे सरकारी खजिन्यात जमा केले जाणार आहेत.

शरीफ यांच्या ज्या जमिनीचा लिलाव झाला ती लाहोर पासून १० किमी अंतरावर आहे. या जमिनीवर सहा लोकांनी मालकी हक्क सांगितला होता. अशरफ मलिक यांच्या म्हणण्यानुसार यांनी ही जमीन शरीफ यांच्याकडून २९ मे २०१९ रोजी साडेसात कोटी रुपयात खरेदी केली आहे. पण शरीफ यांना अटक झाली आणि त्यानंतर ते ब्रिटनला गेल्यामुळे जमिनीची नोंदणी होऊ शकली नाही. पण त्यांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनीचा लिलाव केला गेला. अशरफ यांनीही आता या विक्रीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.