मिग २१ अपघातातील शहीद अभिनव यांनी १ रु. हुंडा घेऊन केला होता विवाह

पंजाबच्या मोगा भागात भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळून झालेल्या अपघातात शहीद झालेले अभिनव चौधरी यांच्या मेरठ येथील घरावर दुःखाची छाया पसरली असून त्याच्या अनेक आठवणीना उजाळा दिला जात आहे. अभिनव यांचा विवाह २९ डिसेंबर २०१९ मध्ये झाला होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने वधू पक्षाकडून केवळ १ रुपया शगुन म्हणजे हुंडा घेऊन हुंड्यासाठी आग्रही असलेल्या समाजासमोर आदर्श ठेवला होता.

अभिनव यांचे वडील सत्येंद्र सांगतात, अभिनव साठी खूप हुंडा देणारे अनेक प्रस्ताव आले पण आम्ही ते नाकारले. लग्न हे दोन कुटुंबांचे मिलन आहे. त्यात हुंडा महत्वाचा नाही अशी आमची धारणा आहे. हुंडा प्रथेला आळा बसावा म्हणून आम्ही शकुन म्हणून केवळ १ रुपया घेतला होता.

अभिनव पहिल्यापासून हुशार विद्यार्थी होता. त्याचे शिक्षण प्रथम देहरादूनच्या राष्ट्रीय इंडिअन मिलिटरी कॉलेज मध्ये आणि नंतर एनडीए मधून झाले. लष्करी सेवेचे त्याला प्रथमपासून आकर्षण होते आणि घरून त्यासाठी पाठींबा होता. एनडीए मधून पास आउट झाल्यावर हैद्राबाद येथे एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यावर २०१४ मध्ये त्याला पहिले पोस्टिंग पठाणकोट येथे मिळाले होते.

विशेष म्हणजे पाकिस्तान हद्दीत विमान कोसळून पकडले गेलेले अभिनंदन यांच्याबरोबर अभिनव यांनी काम केले होते आणि अभिनंदन यांचा अभिनव लाडका सहकारी होता अशीही आठवण सत्येंद्र सांगतात.————-