पांढऱ्या बुरशीवर सहज होतो उपचार- डॉ. गिल्डा

करोनाच्या संसर्गामुळे अगोदरच हैराण झालेल्या रुग्णात काळ्या बुरशीचा फैलाव होऊ लागल्याने काळजीचे वातावरण असतानाच आता पांढरी बुरशी किंवा व्हाईट फंगसचा प्रादुर्भाव काही रुग्णात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे कारण पांढरी बुरशी काळ्या बुरशीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र संक्रामक रोगांचे तज्ञ डॉ. इश्वर गिल्डा यांनी पांढरी बुरशी हा धोकादायक आजार नाही व त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

डॉ. गिल्डा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, पांढरी बुरशी ही मोठी समस्या नाही. त्यामुळे त्याबाबत अपप्रचाराला लोकांनी बळी पडू नये. व्हाईट फंगस ही सर्वसामान्य फंगस असून कित्येक वर्षे आम्ही हे पेशंट पाहिले आहेत. या आजारावर अनेक औषधे आहेत आणि रोगी ३ ते सहा दिवसात बरा होतो.

या बुरशीचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळते. श्वेत पदर या विकारात निम्म्याहून अधिक केसेस या बुरशी संसर्गाच्या असतात. एचआयव्ही रुग्ण, दमेकरी, अधिक प्रमाणात स्टेरॉईड दिली जाणे, रक्त शर्करा जास्त असेल तर या बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. यात जिभेवर आणि टाळूवर पांढरे डाग दिसतात. व्यवस्थित निदान केले गेले तर औषधाने हा विकार पूर्ण बरा होतो. मात्र अनियंत्रित मधुमेह असेल तर प्रतिकार शक्ती कमी असेल तर पांढरी बुरशी संसर्ग नाही ना याची खात्री करून घ्यायला हवी.