कोईमतूर मध्ये उभारले गेले करोनादेवी मंदिर

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजविला आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने या करोना पासून सुटका मिळावी म्हणून जे सुचेल ते करत आहे. कोईमतूरच्या लगत कामचीपुरम भागात कामचीपुरम आदिनाम संस्थेच्या अधिकाऱ्यांनी करोनादेवी मंदिर उभारले आहे. काळ्या दगडातील दीड फुट उंचीची करोनादेवी येथे स्थापन केली गेली असून तिची नियमित पूजाअर्चा, प्रार्थना केली जात आहे. विशेष म्हणजे १९०० सालच्या पहिल्या दशकात जेव्हा प्लेगच्या साथीने असाच कल्लोळ माजत होता तेव्हाही काही लोकांनी एकत्र येऊन असेच प्लेग मरीअम्मनदेवी मंदिर बांधले होते. हे मंदिर आजही आहे.

अर्थात देशातील हे पहिले करोनादेवी मंदिर नाही. यापूर्वी केरळच्या कोलम जिल्ह्यात कडक्कल येथील अनिलन यांनी त्यांच्या घराजवळ करोनादेवी मंदिर बांधले असून त्यात करोना विषाणू सारख्या दिसणाऱ्या मूर्तीची स्थापना केली आहे. अनिलन सांगतात, हिंदू पुराणात देव सर्वत्र आहे असे सांगितले आहे. म्हणजे देव करोना विषाणू मध्येही आहे. त्यामुळे या विषाणूचा नाश करावा यासाठी आम्ही देवाची करून भाकत आहोत. हे मंदिर आम्ही आरोग्य कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलीस, अग्निशमन दल, करोना काळात बातम्यांसाठी फिरणारे पत्रकार याना समर्पित केले आहे असेही अनिलन सांगतात.