काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी AIIMS चे संचालकांनी सांगितल्या तीन महत्वपूर्ण गोष्टी


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान म्यूकरमायकोसीसने (काळ्या बुरशी) चिंता निर्माण केली आहे. बऱ्याच राज्यांतील अनेक लोकांनी या रोगामुळे आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच राज्यांनी याला महामारी जाहीर केली आहे. दरम्यान, काळ्या बुरशीला थांबवण्यासाठी तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. प्रथम, साखरेचे नियंत्रण खूप चांगले असावे, दुसरे म्हणजे आपण स्टेरॉइड्स कधी द्यायचे याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तिसरे स्टेरॉइड्सचा हलका किंवा मध्यम डोस द्यावा, असे दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे.

तर विशेषतः जमिनीत काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव आढळतो, जे निरोगी असतात त्यांना कुठलाही धोका नाही. मात्र, या आजारावर लवकर उपचार सुरु केले, तर रुग्ण यातून सुरक्षित बरा होता, असे मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहन म्हणाले.

शुक्रवारी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, राजधानी दिल्लीतील रुग्णालयात बुधवारी रात्रीपर्यंत काळ्या बुरशीचे 197 रुग्ण आढळले आहेत. बाहेरून येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णांचाही यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. जैन म्हणाले, या आजाराच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनची संपूर्ण देशात कमतरता आहे. केंद्राकडून दिल्लीला 2000 इंजेक्शन्स मिळण्याची अपेक्षा आहे, जी या रुग्णालयांना दिली जातील.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांनी स्टेरॉइड न घेण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. ते म्हणाले, हे खूप धोकादायक असून स्टेरॉइड घेतल्यावर रुग्णांची प्रतिकारशक्ती शून्यावर येते. काळी बुरशी माती किंवा सडलेल्या वस्तूंमध्ये घरात आढळते. निरोगी व्यक्तींवर त्याचा परिणाम होत नाही. परंतु, अशक्त रोग प्रतिकारशक्ती असणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.